Samruddhi highway robberies Nashik Police apprehend four who looted eighteen lakh within forty eight hours : समृद्धी महामार्गावर सिन्नर परिसरात झालेल्या मोठ्या दरोड्याच्या घटनेने राज्यभर खळबळ उडाली होती. मात्र नाशिक ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास करत अवघ्या ४८ तासांत सात संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात एकूण १२ जणांचा सहभाग असल्याचा पोलिसांचा संशय असून उर्वरित पाच आरोपींचा शोध सुरू आहे. प्राथमिक तपासात ही टोळी धाराशिव जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.
सिन्नर तालुक्यातील मलढोण आणि दुशिंगपूर परिसरात समृद्धी महामार्गावर ही घटना घडली होती. दरोडेखोरांनी रस्त्यावर धारदार लोखंडी वस्तू टाकून धावत्या वाहनांचे टायर पंक्चर केले. वाहन थांबल्यानंतर प्रवाशांना लक्ष्य करत लुटमार करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथील एका कुटुंबाच्या वाहनातील प्रवाशांना मारहाण करून सुमारे १८ लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. या घटनेची गंभीर दखल घेत नाशिक ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करण्यात आली. तब्बल दहा स्वतंत्र तपास पथकांनी वेगवेगळ्या दिशांनी या प्रकरणाचा शोध घेतला.
आरोपींपर्यंत पोलिस कसे पोहोचले?
तपासादरम्यान दरोडेखोरांनी घटनास्थळापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर आपली वाहने उभी केल्याचे पोलिसांना समजले. या धाग्यावरून पोलिसांनी तेरखेडा, पाणगाव, खामकरवाडी आणि उमरा या परिसरात व्यापक शोधमोहीम राबवली. तांत्रिक तपासाबरोबरच परिसरातील मेडिकल दुकाने, ग्रामपंचायत कार्यालये, हॉटेल्स आणि इतर ठिकाणची माहितीही तपासण्यात आली. या तपासातून मिळालेल्या महत्त्वाच्या धाग्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपींपर्यंत मजल मारली.या कारवाईत अर्जुन पवार, अशोक शिंदे, लखन काळे, धनाजी पवार, नितीन शिंदे आणि गोविंद पवार यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली दोन वाहनेही पोलिसांनी जप्त केली आहेत.
IPL 2027 ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम रद्द होणार? बीसीसीआय घेणार मोठा निर्णय
पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरील ही अत्यंत गंभीर घटना असल्याने पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली. विविध तांत्रिक आणि प्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारे सात आरोपींना पकडण्यात यश आले असून या प्रकरणात एकूण १२ जणांचा सहभाग असल्याचा संशय आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके अद्याप कार्यरत आहेत.
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा थरार
मलढोण-दुशिंगपूर परिसरात दरोडेखोरांनी काही वाहनांना लक्ष्य केले होते. रस्त्यावर टोकदार वस्तू टाकून दोन ते तीन वाहनांचे टायर निकामी करण्यात आले. त्यानंतर वाहन थांबवून प्रवाशांकडील मौल्यवान वस्तू लुटल्याचा आरोप आहे.या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी समृद्धी महामार्गावरील सुरक्षाव्यवस्थेबाबतही पोलिसांकडून नव्याने नियोजन केले जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.
