छत्रपती संभाजीनगरातील खवड्या डोंगरावरून (Crime) उडी घेत चांदगुडे कुटुंबातील तिघांनी जीवन संपवल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. वडील आणि मुलामधील वादातून ही घटना घडल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते. आयफोनच्या हप्त्यांवरून कुणाल चांदगुडे याचा वडिलांशी वाद झाल्याची चर्चाही सोशल मीडियावर सुरू होती. या घटनेचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, आता या प्रकरणाला कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी असल्याचा दावा केला जात असल्याने तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या संगीता चांदगुडे या यूट्यूबर होत्या. त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर विविध विषयांवरील अनेक व्हिडीओ उपलब्ध आहेत. त्यापैकी काही व्हिडीओंमध्ये त्यांनी कौटुंबिक वाद आणि नातेसंबंधांबाबत भाष्य केले आहे. याच व्हिडीओंमुळे चांदगुडे कुटुंबीय आणि संगीता चांदगुडे यांच्या नणंदेमध्ये काही कारणावरून वाद होता का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, या दाव्यांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
संगीता चांदगुडे यांच्या एका व्हिडीओमध्ये त्यांनी नणंदेचा उल्लेख करत काही गंभीर आरोप केले आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांनी कोणाचेही नाव घेतलेले नाही. मात्र, भावाच्या संसारात हस्तक्षेप करणे, भावजयीला समजून न घेणे, मुलांना शिवीगाळ करणे, भांडणे लावणे आणि संसार मोडण्याचा प्रयत्न करणे, असे आरोप त्यांनी केले आहेत. संसार मोडता न आल्यास संपत्तीमध्ये हिस्सा मागण्याचा प्रयत्न केला जातो, असाही दावा त्यांनी केला आहे.
याच व्हिडीओमध्ये संगीता यांनी पुढे आपल्या कुटुंबावर आलेल्या संकटाच्या काळातही साथ न मिळाल्याचा आरोप केला आहे. भावाच्या दुःखात साथ न देणे, भावजयीला त्रास देणे आणि कठीण प्रसंगी अपमानास्पद वर्तन करणे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, नंतर परिस्थिती बदलल्यानंतर पूर्वीचे सर्व काही विसरून जाण्याची अपेक्षा का केली जाते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. “आज तुम्हाला तुमच्या बहिणीसाठी वाईट वाटतंय; मग तुमच्या मुलासाठी आणि बायकोसाठी का वाईट वाटलं नाही?” असा सवाल त्यांनी केला होता.
दरम्यान, संगीता चांदगुडे यांनी आपल्या पतीलाही उद्देशून या व्हिडीओमध्ये नाराजी व्यक्त केल्याचे दिसते. पतीने आपल्या बहिणींच्या चुका माफ केल्या, मात्र स्वतःची कोणतीही चूक नसताना आपल्याला शिक्षा का मिळावी, असा सवाल त्यांनी केला. समाजात आपल्याला चुकीचे ठरवले जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. “वाईट तुम्ही वागले, मी वाईट वागले नाही,” असे त्या म्हणताना दिसतात.
आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर काही जणांनी सण साजरे केले आणि पार्टी केल्याचा दावाही संगीता यांनी या व्हिडीओमध्ये केला आहे. आपण मात्र तसे काही केले नसल्याचे सांगत, संकटाच्या काळात साथ दिली नसेल तर भविष्यात आपल्याकडूनही मदतीची अपेक्षा करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. त्यामुळे या जुन्या व्हिडीओंच्या पार्श्वभूमीवर चांदगुडे कुटुंबातील नेमका वाद काय होता, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, संपूर्ण प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून तपासातूनच घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
