विकास लवांडेंवर काळी शाई फेकून धक्काबुक्की; संग्राम भंडारे आणि समर्थकांवर पिस्तूल दाखवून धमकावल्याचा गंभीर आरोप

विकास लवांडे यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, संग्राम महाराज भंडारे आणि त्यांच्या समर्थकांनीच हा हल्ला घडवून आणला.

Untitled Design 3 1

Untitled Design 3 1

Sangram Bhandare throws ink at Vikas Lawande : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एका गंभीर राजकीय आणि सामाजिक वादाला तोंड फुटले आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा वक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाई फेकून धक्काबुक्की करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून, या प्रकारामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. या घटनेनंतर आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झाली असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हवेली तालुक्यातील आळंदी मातोबा परिसरात शुक्रवारी एका धार्मिक कार्यक्रमाचे आणि प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विकास लवांडे उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर रात्री उशिरा ते आपल्या सहकाऱ्यांसह पुण्याकडे परतत असताना ही घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. रात्री सुमारे दहाच्या सुमारास काही अज्ञात वाहनांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग सुरू केला. त्यानंतर काही अंतरावर त्यांच्या वाहनाला अडवून गोंधळ घालण्यात आला.

विकास लवांडे यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, संग्राम महाराज भंडारे आणि त्यांच्या समर्थकांनीच हा हल्ला घडवून आणला. तीन ते चार चारचाकी वाहनांमधून आलेल्या 10 ते 15 जणांनी माझी गाडी अडवली. त्यांनी माझ्यावर काली शाई फेकली, धक्काबुक्की केली आणि पिस्तूल दाखवून धमकावले. हा प्रकार पूर्णपणे नियोजनबद्ध होता, असा आरोप लवांडे यांनी केला आहे.

यावेळी लवांडेंनी अत्यंत आक्रमक शब्दांत प्रतिक्रिया देताना, वारकऱ्यांमधील नथुराम गोडसे असलेले गुंड असा उल्लेख करत संग्राम भंडारे यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या या प्रकरणाला आणखी राजकीय आणि सामाजिक रंग चढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर विकास लवांडे तातडीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी संपूर्ण प्रकारची माहिती पोलिसांना देत संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत प्राथमिक चौकशी सुरू केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. तसेच घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही साक्षीदारांची देखील चौकशी केली जात असल्याची माहिती समोर येत आहे.

माझ्या आमदाराची सही बनावट; टीटीव्ही दिनकरनांचा विजयच्या पक्षावर थेट हल्ला, पोलिसांत तक्रार दाखल

दरम्यान, या घटनेमुळे पुणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. विविध सामाजिक संघटना आणि राजकीय कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचा आरोप करत दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, संत परंपरेचा आणि समतेच्या विचारांचा आत्मा आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांनी दिलेला मानवतेचा संदेश आजही लाखो वारकऱ्यांच्या माध्यमातून समाजात पोहोचत आहे. मात्र काही स्वयंघोषित धर्मरक्षक आणि विकृत मानसिकतेचे लोक वारकरी संप्रदायात घुसखोरी करून या पवित्र परंपरेची बदनामी करण्याचे कटकारस्थान रचत आहेत, ही अत्यंत गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अमोल मातेले यांनी दिली आहे.

दुसरीकडे, संग्राम महाराज भंडारे किंवा त्यांच्या समर्थकांकडून अद्याप या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात पुढे कोणते नवे खुलासे होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिस तपासानंतरच या घटनेमागील नेमके कारण आणि सत्य परिस्थिती स्पष्ट होणार असली, तरी पुणे जिल्ह्यात घडलेल्या या प्रकाराने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Exit mobile version