ताथवडेतील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमधील दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल; सुरक्षा रक्षकाच्या मृत्यूनंतर व्यवस्थापन अडचणीत

वाकड पोलिसांनी शाळेचे प्राचार्य, व्यवस्थापन आणि गेटच्या देखभाल व सुरक्षिततेसाठी जबाबदार असलेल्या संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design (12)

The issue of school security systems has once again come to the forefront : पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये मुख्य प्रवेशद्वाराचे जड स्लायडिंग लोखंडी गेट अंगावर कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर वाकड पोलिसांनी शाळेचे प्राचार्य, व्यवस्थापन आणि गेटच्या देखभाल व सुरक्षिततेसाठी जबाबदार असलेल्या संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शाळांमधील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 31 जुलै रोजी सकाळी सुमारे 8.10 वाजण्याच्या सुमारास सुरक्षा रक्षक संजय नागनाथ कांबळे हे नेहमीप्रमाणे शाळेचे मुख्य प्रवेशद्वार उघडण्याचे काम करत होते. त्याचवेळी मुख्य गेट अचानक ट्रॅकवरून निसटले आणि थेट त्यांच्या अंगावर कोसळले. गेटचे वजन प्रचंड असल्याने कांबळे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. शाळेत येणारे विद्यार्थी, पालक आणि कर्मचारी यांच्यातही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपास सुरू केला. प्राथमिक तपासात गेटच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. गेटची नियमित देखभाल केली जात होती का, त्याची वेळोवेळी तांत्रिक तपासणी झाली होती का, तसेच गेटच्या ट्रॅक, चाके आणि संरचनेची स्थिती सुरक्षित होती का, याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.

दफनविधीहून परतताना कार विहिरीत कोसळली; दोन महिलांचा मृत्यू

तपासादरम्यान गेटची आवश्यक दुरुस्ती, मजबुतीकरण आणि सुरक्षा तपासणी करण्यात दुर्लक्ष झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. गेटच्या संरचनात्मक सुरक्षिततेची खात्री न करता त्याचा वापर सुरू ठेवण्यात आल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचाही आरोप समोर आला आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१) अंतर्गत निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

शाळेचे प्राचार्य, व्यवस्थापन तसेच गेटची देखभाल, सुरक्षितता आणि व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या संबंधित व्यक्तींना या गुन्ह्यात जबाबदार धरण्यात आले आहे. तपास अधिकारी विठ्ठल साळुंखे यांनी सांगितले की, अपघातग्रस्त गेट हे स्लायडिंग प्रकारचे होते. दुर्घटनेच्या वेळी ते ट्रॅकवरून नेमके कशामुळे निसटले, याचा तपास सुरू आहे. तांत्रिक अहवाल, देखभाल नोंदी आणि संबंधित कर्मचाऱ्यांचे जबाब तपासले जात असून दुर्घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, तपास पूर्ण झाल्यानंतर गेटच्या देखभालीत निष्काळजीपणा झाला का, सुरक्षा मानकांचे उल्लंघन झाले का आणि या दुर्घटनेसाठी नेमकी जबाबदारी कोणाची आहे, हे स्पष्ट होणार आहे. सुरक्षा रक्षक संजय कांबळे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

या घटनेमुळे शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणांवरील प्रवेशद्वार, संरचना आणि सुरक्षा यंत्रणांची नियमित तपासणी किती महत्त्वाची आहे, याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.

follow us