Sanjay Raut compares Modi to Hitler : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्रांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी विजय रॅलीपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आंदोलनाच्या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांच्या एकजुटीला देत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
संजय राऊत म्हणाले की, देशभरातील विद्यार्थ्यांनी केलेल्या संघर्षामुळे केंद्र सरकारला अखेर माघार घ्यावी लागली. युवा शक्तीच्या सर्व मागण्या मान्य कराव्या लागल्या. एका केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा लागला. मोदींसारखे लोक जेव्हा झुकलेले जातात, तेव्हा हिटलरला झुकवल्याचा आनंद मिळतो, असे वक्तव्य त्यांनी केले. या आंदोलनादरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला असून, काही विद्यार्थ्यांनी आपले प्राण देखील गमावल्याची दावा संजय राऊत यांनी केला. 21 मुलं या लढ्यात बळी पडली आहेत.
त्यामुळे आज विजयाचा आनंद साजरा करत असलो, तरी त्या विद्यार्थ्यांचे बलिदान विसरता येणार नाही. त्यांना श्रद्धांजली अर्पण करूनच हा विजय साजरा केला जाईल, असे ते म्हणाले. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या रॅलीबाबत बोलताना राऊत यांनी हा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा कार्यक्रम नसल्याचा दावा केला. या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे, [मालकांचे आणि नागरिकांचे आभार मानण्यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. येथे कोणत्याही पक्षाचा झेंडा फडकणार नाही. हा लोकशक्ती आणि युवा शक्तीच्या विजयाचा उत्सव आहे, असे त्यांनी सांगितले.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा प्रभाव; महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा
यावेळी त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर देखील टीकेची झोड उठवली. आजची तरुण पिढी पूर्वीपेक्षा वेगळी आहे. त्यांची विचारसरणी, प्रश्न विचारण्याची पद्धत आणि अन्यायाविरोधात उभे राहण्याची ताकद अधिक मोठी आहे. सोशल मीडियाच्या युगात सत्य दडपणे सोपे राहिलेले नाही. भाजपच्या आयटी सेलला देखील या तरूणानाच्या लाटेसमोर टाळे लावावे लागले, असा टोला त्यांनी लगावला. सत्ताधाऱ्यांना इशारा देताना राऊत म्हणाले, सत्ता आहे, बहुमत आहे म्हणून जास्त माज दाखवू नका. लोकशाहीमध्ये जनतेचा आवाज सर्वात मोठा असतो.
तरुणांच्या भावना दुर्लक्षित केल्या तर त्याचे परिणाम सत्ताधाऱ्यांना भोगावे लागतात. हिटलरसारखे वागाल तर इतिहासात जसे हिटलरचे झाले, त्याच मार्गाने सत्ताधाऱ्यांना देखील जावे लागेल. संजय राऊत यांच्या या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी आंदोलन, केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा आणि त्यानंतरच्या राजकीय प्रतिक्रिया यामुळे हा विषय सध्या राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.
