नाशिक : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उपनेते अद्वय हिरे (Advay Hirey) यांंच्यावरील अटकेची कारवाई म्हणजे राजकीय दबावतंत्र आणि सुडाचा प्रकार आहे. त्यांच्यावरील आरोप हे ते भाजपमध्ये (ऱ असतानाही होते. मात्र उद्धव ठाकरेंसोबत आल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. यामागे त्यांनी मालेगावची विधानसभा निवडणूक लढू नये यासाठी झालेले प्रयत्न आहेत. तिथल्या मंत्रिमहोदयांनी पराभवाच्या भीतीने शासकीय यंत्रणेचा गैरवापर करुन ही अटक घडवून आणली आहे, असा मोठा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. (Sanjay Raut criticizes arrest action against Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) deputy leader Advay Hirey)
राऊत म्हणाले, अद्वय हिरे हे शिवसेनेत आले, त्यावेळी त्यांनी मालेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा दृष्टीने तयारी सुरु केली. त्यांनी उद्धव ठाकरे यांची भव्य जाहीर सभा घेतली. संपूर्ण मतदारसंघ त्यांनी ढवळून काढला. हे चित्र बघून आपल्या पराभवाच्या भीतीने मंत्री दादा भुसे यांनी मागील वर्षभरापासून हिरे यांच्याविरोधात 40 हून अधिक गुन्हे दाखल केले आहेत. पण त्याचवेळी मंत्री दादा भुसे यांच्यावरील आरोपांचे काय? राहुल कुल यांच्यावरील मनी लाँड्रिंग प्रकरणाचे काय? असा सवाल करत शिवसेना हिरे यांच्या पाठीशी खंबीर पणे उभी आहे, लढत राहू आणि जिंकू असा निर्धार राऊत यांनी व्यक्त केला.
गिरना मौसम सहकारी साखर कारखान्यातील 178 कोटींच्या अफरातफर प्रकरणात मंत्री दादा भुसे अडकले आहेत, पण अद्याप कारवाई नाही. दौंडमधील भीमा पाटस साखर कारखान्याती 500 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर कारवाई नाही. मंत्रिमंडळात अनेक भ्रष्ट लोक जामिनावर आहेत. सहकारी बँकाचे अनेक थकबाकीदार सरकारात आहेत. अद्वय हिरे यांनी मालेगावात सक्रिय राहू नये. मालेगाव विधान सभा निवडणुक लढू नये यासाठी राजकीय दबाव होता. हिरे झुकले नाहीत, त्यांना अटक झाली. शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभी आहे लढत राहू आणि जिंकू. जय महाराष्ट्र!
अद्वय हिरे यांना काल (15 नोव्हेंबर) मध्य प्रदेशमधील भोपाळमधून अटक करण्यात आली आहे. मालेगाव येथील रेणूका सहकारी सूत गिरणीसाठी जिल्हा बँकेकडून घेतलेले कर्ज न फेडल्यामुळे त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला होता. पण त्यानंतर ते बेपत्ताच होते.
अखेर ऐन दिवाळीत पोलिसांनी मोबाईल लोकेशन ट्रेस करत त्यांना भोपाळमधून अटक केली आहे. अद्वय हिरे हे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यांच्यारुपाने ठाकरे गटाला भुसे यांच्या बंडखोरीनंतर नाशिक, मालेगाव पट्ट्यात तगडा राजकीय पर्याय उभा राहिला असल्याचे सांगण्यात येत होते