44 हजार मेंढ्या… 30 कोटींची जमीन… लाखो भाविकांची अपार श्रद्धा असलेल्या बाळूमामांच्या देवस्थानात नेमकं काय घडलं?

Sant Balumama Devasthan Trust संत सद्गुरू बाळूमामा हे महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरातमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

Sant Balumama Devasthan Trust

Sant Balumama Devasthan Trust

Sant Balumama Devasthan Trust : ज्या बाळूमामांवर लाखो भाविकांची अपार श्रद्धा आहे, जिथे हजारो भक्त दर्शनासाठी येतात त्याच देवस्थानात तब्बल 60 कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. धर्मादाय आयुक्त मुख्यालय, मुंबई येथील देवस्थान शाखेचे निरीक्षक राजेंद्र (रंगराव) गडकरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. नेमकं हे प्रकरण काय? त्याबद्दल जाणून घेऊया…

नेमकं प्रकरण काय?

कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर (ता. भुदरगड) येथील संत बाळूमामा देवस्थान महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरातमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मात्र. देवस्थान ट्रस्टमध्ये तब्बल 60 कोटी 75 लाख 28 हजार रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.

माजी धर्मादाय निरीक्षक, देवस्थान सचिवांवर गुन्हा

धर्मादाय विभागाच्या चौकशीनंतर या प्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्यात तत्कालीन कार्याध्यक्षा तथा धर्मादाय निरीक्षक रागिणी झुंजारराव खडके, देवस्थानचे सचिव रावसाहेब बिराप्पा कोणकेरी यांच्यासह सर्व संबंधित विश्वस्त, व्यापारी, कंत्राटदार आणि जबाबदार पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहा वर्षांच्या व्यवहारांवर संशय

फिर्यादीनुसार, मार्च 2020 ते मार्च 2026 या सहा वर्षांच्या कालावधीत ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप आहे. देवस्थानच्या निधीचा गैरवापर, लेखापरीक्षणातील त्रुटी, मालमत्तेच्या व्यवस्थापनातील गंभीर हलगर्जीपणा, जमीन खरेदी-विक्रीतील संशयास्पद व्यवहार आणि मेंढी विक्रीतील आर्थिक घोटाळा अशा अनेक बाबी चौकशीत समोर आल्या आहेत.

44 हजार मेंढ्यांच्या विक्रीवर प्रश्नचिन्ह

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे देवस्थानच्या मालकीच्या ४४ हजार मेंढ्यांच्या विक्रीत मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप आहे. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मेंढीची बाजारभावानुसार किंमत किमान 15 हजार रुपये असताना ती केवळ सुमारे 5,500 रुपयांना विकल्याचे चौकशीत समोर आले आहे. या व्यवहारामुळे देवस्थानचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा संशय आहे.

जमीन व्यवहारात 30 कोटींचा संशय

याशिवाय देवस्थानच्या जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारातही सुमारे 30 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे. या व्यवहारांची आता आर्थिक गुन्हे शाखेकडून सखोल चौकशी केली जाणार आहे.

उच्च न्यायालयाच्या समितीनंतर कारवाई

देवस्थानच्या कारभाराबाबत गेल्या काही वर्षांपासून सातत्याने तक्रारी होत होत्या. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने न्यायिक अधिकारी एम. बी. लंबे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. या समितीच्या अहवालानंतर धर्मादाय विभागाने तपास सुरू केला आणि त्याआधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तत्कालीन कार्याध्यक्षच निलंबित

मंदिरातील गैरव्यवहारांवर नियंत्रण आणण्यासाठी रागिणी खडके यांच्याकडे देवस्थान समितीच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र, चौकशीत त्यांच्याच भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने महिनाभरापूर्वी त्यांना निलंबित करण्यात आले होते.

”बहुतांश कालावधीत मी पदावर नव्हतेच”

दरम्यान, माजी कार्याध्यक्षा रागिणी खडके यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. “मी मे 2024 ते 4 जुलै 2025 या कालावधीतच कार्याध्यक्ष होते. ज्या सहा वर्षांच्या गैरव्यवहाराचा आरोप केला जात आहे, त्या बहुतांश कालावधीत मी पदावर नव्हते. त्यामुळे या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही,” असा दावा खडके केला आहे. तसेच, ट्रस्टमध्ये 21 विश्वस्त असताना केवळ दोघांवरच गुन्हा का दाखल करण्यात आला? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

दस्तऐवज ताब्यात; तपास सुरू

पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितले की, हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून, देवस्थानचे महत्त्वाचे दस्तऐवज ताब्यात घेण्यात आले आहेत. कागदपत्रांची छाननी सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

भाविकांमध्ये खळबळ

संत सद्गुरू बाळूमामा हे महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरातमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दर अमावस्येला हजारो भाविक आदमापूर येथे दर्शनासाठी येतात. अशा देवस्थानाच्या ट्रस्टमध्ये कोट्यवधी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल झाल्याने भाविकांमध्ये आश्चर्य आणि चिंता व्यक्त केली जात आहे. आता या प्रकरणाच्या तपासातून नेमकं सत्य काय समोर येतं आणि आणखी कोणाची नावे पुढे येतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version