NCP Merger : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य (NCP) विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग आला असतानाच सिल्व्हर ओकवर राजकीय हालचाली वाढल्या आहेत. रुग्णालयात दोन दिवस उपचार घेतल्यानंतर शरद पवार यांना डिस्चार्ज मिळाला असून ते आपल्या निवासस्थानी परतले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटातील ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर हजेरी लावली. या नेत्यांसोबत शरद पवार यांची गेल्या दोन तासांपासून चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
या बैठकीत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांच्यासह पक्षातील प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासोबतच या भेटीत राजकीय घडामोडींवरही चर्चा होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, बैठकीत नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा सुरू आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सिल्व्हर ओकवरील या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीला; दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग
विशेष म्हणजे, शरद पवार यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते पार्थ पवार हे देखील यापूर्वी सिल्व्हर ओकवर आले होते. त्यांनी शरद पवार यांच्यासोबत सुमारे दोन तास चर्चा केली होती. पार्थ पवार यांच्या भेटीनंतर आता शरद पवार गटातील वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू झाल्याने या भेटीगाठींना राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. दोन्ही गटांतील नेत्यांच्या वाढत्या भेटींमुळे राष्ट्रवादीच्या भविष्यातील राजकीय भूमिकेबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, शरद पवार रुग्णालयात असताना अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनीही त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली. त्यातच सुनील तटकरे यांनी विलिनीकरणाबाबत मोठा दावा केला होता. सध्या विलिनीकरणाची कोणतीही चर्चा नसली, तरी अजित पवार असते तर 12 फेब्रुवारी रोजीच विलिनीकरण झाले असते आणि याबाबत अजित पवार यांनी आपल्याला कल्पना दिली होती, असे तटकरे यांनी म्हटले होते. या दाव्यानंतर आता सिल्व्हर ओकवर सुरू असलेल्या बैठकीमुळे विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे.
