Sharad Pawar’s big revelation from the press conference : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातात निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाची चर्चा, तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत महत्त्वपूर्ण खुलासे केले. नरेश अरोरा कोण आहेत किंवा त्यांची सुनेत्रा पवार यांच्याशी नेमकी काय चर्चा झाली, याची मला कोणतीही माहिती नाही, असे स्पष्ट करत शरद पवार यांनी अफवांना पूर्णविराम दिला. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याबाबत गेले चार ते पाच महिने चर्चा सुरू होती, अशी माहिती त्यांनी दिली.
या संपूर्ण चर्चेचे नेतृत्व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे करत होते. सर्व निर्णय आणि संवाद या दोघांमध्येच होत होते. मात्र, अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर या प्रक्रियेला खंड पडलेला दिसत आहे, असेही शरद पवार म्हणाले.
12 तारखेला घोषणा होणार होती
पत्रकारांनी “एवढी घाई कशासाठी सुरू आहे?” असा सवाल केला असता शरद पवार म्हणाले, “मला इतकंच माहिती आहे की, आमच्या पक्षात आणि अजित पवार यांच्या पक्षात एकत्र काम करण्याबाबत एकमत झालं होतं. 12 तारखेला याबाबत अधिकृत घोषणा करायची होती. मात्र, दुर्दैवाने हा अपघात झाला. यापेक्षा अधिक माहिती मला कोणी दिलेली नाही.”
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीविषयी माहित नाही…, शरद पवारांनी पत्रकार परिषदेतून केले स्पष्ट
सुनेत्रा पवार यांच्या निवडीवर भाष्य
सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, “अजित पवार पक्षाची जबाबदारी सांभाळत होते. ते गेल्यानंतर पक्षाला पुढे नेण्यासाठी कुणीतरी पुढे यायला हवे. त्यातूनच पक्षाने निर्णय घेतलेला दिसतो.” तसेच, “दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये सुसंवाद ठेवण्यासाठी चर्चा सकारात्मक दिशेने सुरू होती. मात्र अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे या प्रक्रियेत खंड पडला,” असेही त्यांनी नमूद केले. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी त्यांच्या पक्षाबाबत काही निर्णय घेतले असतील, मात्र सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत मला कोणतीही माहिती नाही. मला याबाबत कोणीही सांगितलेले नाही, असा खुलासाही शरद पवार यांनी केला.
