Sharad Pawar’s Nationalist Congress Party will not field a candidate : दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर रिय झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीच्या कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीच्या अधिकृत घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार या दोन्ही मतदारसंघामध्ये 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती मतदारसंघ रिक्त आला होता. त्यामुळे या जागेकडे संपूर्ण राज्याचे राजकीय लक्ष लागले आहे.
दरम्यान,पोटनिवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांनाच उमेदवारी देण्यात येणार आहे. त्यामुळे बारामतीत पुन्हा एकदा पवार कुटुंबातील सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम; राज्यात गॅस टंचाईची भीती, वितरकांना पोलीस संरक्षण
विशेष म्हणजे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र या पोटनिवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. पक्षांतर्गत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून सांगितले जात आहे. मागील विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी बारामतीत पवार कुटुंबातीलच सदस्यांमध्ये थेट लढत पाहायला मिळाली होती. मात्र आता परिस्थिती बदललेली दिसत असून शरद पवार गट निवडणूक न लढवण्याचा भूमिकेत आहे.
दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली सहानुभूतीची लाट आणि पवार कुटुंबाचा बारामतीतील प्रभाव लक्षात घेता ही निवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाची मनाली जात आहे. दरम्यान सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर बारामतीत ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. इतर पक्ष उमेदवार देणार का, की सहानुभूतीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक बिनविरोध होईल, याबाबत पुढील काही दिवसांत चित्र स्पष्ट होणार आहे.
