Sharad Pawar’s press conference clarified : बारामती येथे 28 जानेवारी रोजी झालेल्या भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. अजित पवार यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामती येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या कार्याचा गौरव करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
शरद पवार म्हणाले, “अजित पवार हे कर्तृत्ववान नेते होते. अशा कर्तृत्ववान व्यक्तीचे जाणे हा केवळ कुटुंबासाठी नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोठा आघात आहे. आज ते हयात असते, तर ते घरी बसले नसते; ते फिल्डवरच काम करत असते.” अजित पवारांनी अनेक वर्षे संघटना मजबूत ठेवण्यासोबतच सामान्य जनतेशी थेट संवाद साधत काम केल्याचे शरद पवार यांनी नमूद केले. “लोकांच्या प्रश्नांची माहिती घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न अजित नेहमी करत असे. कामात त्याने कधीही कमतरता ठेवली नाही,” असेही ते म्हणाले.
आमदार नसताना देखील सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री होऊ शकतात का, कायदा काय सांगतो?
या दुःखद परिस्थितीला सामोरे जाताना पुढील पिढीवर मोठी जबाबदारी असल्याचे सांगत शरद पवार म्हणाले, “लोकांचे दुःख कमी करण्यासाठी आपल्याला अधिक काम करावे लागेल. नव्या पिढीची जबाबदारी आता अधिक आहे.” दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबत विचारले असता शरद पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “सुनेत्रा पवार शपथ घेणार असतील, तर तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. पटेल आणि तटकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. याबाबत माझ्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही,” असे त्यांनी सांगितले.
“मुंबईत कुठे चर्चा झाली असेल, पण आमच्याकडे त्याबाबत कोणतीही माहिती नाही. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असून, त्यावर मी भाष्य करणार नाही,” असे स्पष्ट करत शरद पवारांनी चर्चांना पूर्णविराम दिला.
