Share Market Scam: गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यातील शेवगाव (Shevgaon)तालुका हा शेअर मार्केट (Share Market) प्रकरणामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. तालुक्यात मोठ्या संख्येने ट्रेडर (trader) निर्माण झाले आहे. गुंतवणूकदारांना अधिक परताव्याची आमिष दाखवून गुंतवणूक करून घेत आहे व काही महिन्यांमध्येच पसार होत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये शेवगाव तालुक्यातून चार ते पाच ट्रेडर यांनी आपली दुकाने गुंडाळून घेत गुंतवणूकदारांचे कोट्यवधी घेऊन पसार झाले आहे. सर्वसामान्य नागरिक या शेअर मार्केटच्या नावाखाली सुरु असलेल्या भुलभुलैय्या याला बळी पडत आहे. यामुळे फसवणूक झालेली अनेकांची संसारे ही रस्त्यावर आली आहे.
गुंतवणूकदार अमिषाला बळी पडतायत
शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून चांगला नफा मिळवता येतो हे आपल्याला माहित आहे. मात्र ज्यांना याचे ज्ञान नाही अशा व्यक्तींना जास्त परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून गुंतवणूक करून घ्यायची अशी चलाखी हे ट्रेडर करत आहे. महिन्याला आठ ते दहा टक्के प्रॉफिट हे ट्रेडर गुंतवणूकदारांना देत असल्याने नागरिक देखील या अमिषाला बळी पडू लागले. गुंतवणूक दुप्पट करण्याच्या आमिषाने शेवगाव तालुक्यात अनेकांची कोट्यवधींनी फसवणूक झाली आहे.
शेअर मार्केटमध्ये आर्थिक गुंतवणुकीचे अज्ञान असणारे अनेक जण सहजरित्या या मोहमाया मध्ये अडकू लागले आहे . विशेष म्हणजे अख्या जिल्ह्यात सध्या स्थितीला शेवगाव तालुका शेअर मार्केट फसवणुकीचा सर्वात मोठा स्पॉट ठरत आहे. सुमारे 800 ते 1000 कोटींची गुंतवणूक एकट्या शेवगाव तालुक्यात झाली असल्याची चर्चा रंगते आहे. यातच धक्कादायक म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन अनेक ट्रेडर्सनी पलायन केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. त्यामुळे अनेकांचे संसारे हे उद्धवस्त झाली आहे. जमिनी, सोने नाणे विकून पैसे जमवून अनेकांनी गुंतवणूक केली होती मात्र जसजसा हा दिखाव्याचा फुगा फुटू लागला आहे यामुळे गुंतवणूकदारांची देखील धडधड वाढू लागली आहे.
चोरीचा मामला ना हळूहळू बोंबला
जादाच्या परताव्याच्या आमिषाने अनेकांनी लाखो तसेच काही व्यावसायिकांनी कोट्यवधींची गुंतवणूक या ट्रेडरकडे केली आहे. काही महिने प्रॉफिट झाला देखील मात्र आता याच भामटयांनी पैसे घेऊन पसार झाले आहे. यातील काहींनी शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवलाच नाही. काही ट्रेडर्सनी गुंतवणूक केली, परंतु ‘डी-मॅट’ खात्याचा सर्व अँक्सेस हा ट्रेडडकडे असल्याने गुंतवणूकदारांची फसवणूक झाली. आज तालुक्यात ट्रेडिंगची दुकाने चालवणाऱ्या या भामटयांनी कोट्यवधींना गंडा घातला आहे. शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक होऊन सुद्धा कोणीही अद्याप पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली नाही. यामुळे फरार झालेले तुपाशी तर गुंतवणूक करणारे उपाशी अशी अवस्था निर्माण झाली आहे.
ट्रेडिंगची शंभरहून अधिक दुकाने थाटली
शेवगाव तालुक्यात सुरुवातीला काही ठराविक व्यक्तींकडून अधिक प्रॉफिट देत गुंतवणुकी स्वीकारल्या जात होत्या. हा पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवला जातो असे देखील गुंतवणूकदारांना सांगितले जात होते. त्यानंतर अख्या तालुक्यात अनेकांनी हीच टेक्निक अवलंबत स्वतःची दुकाने थाटली. रोख स्वरूपात रक्कमा स्वीकारू लागले. म्हणता म्हणता एकट्या शेवगाव तालुक्यात शंभरहून अधिक ट्रेडर ही उदयास आले.
गुंतवणूकदारांना ऑनलाईन प्रॉफिट दिले जायचे यामुळे अनेकजण निवांत झाले. मात्र जेव्हा दोन महिने होऊनही पैसे येईना व नेमकं काय झाले हे जाणून घेण्यासाठी गेले असता हेच ट्रेडर गुंतवणुकीची रक्कम घेऊन पसार झाल्याचे समोर आले.