Shinde’s Shiv Sena corporator in contact with Uddhav Thackeray : राज्यात पार पडलेल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने प्रभावी कामगिरी करत सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. काही महापालिकांमध्ये भाजपाने स्वबळावर सत्ता मिळवली असून, एकूणच निकालांमध्ये भाजपाच राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने एकत्रितपणे लढत दिली होती. निकालांनुसार भाजपाचे 89 तर शिवसेना शिंदे गटाचे 29 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांची युती मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
मात्र सत्ता स्थापनेपूर्वीच राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबईचा महापौर भाजपाचा असणार, असा दावा केला जात असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची अट पुढे ठेवल्याची चर्चा आहे. महापौरपद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यावे, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या सर्व 29 नगरसेवकांना एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, आता या संपूर्ण घडामोडींमध्ये एक धक्कादायक दावा समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटातील काही नगरसेवकांचा थेट उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क असल्याचा खुलासा झाला आहे. विशेष म्हणजे, शिंदे गटातील एका नगरसेवकाने उद्धव ठाकरे यांच्या अतिशय जवळच्या व्यक्तीशी फोनवर संवाद साधल्याची माहिती आहे. या संवादात संबंधित नगरसेवकाने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविषयी कोणताही आकस नसल्याचे स्पष्ट केले असून, आजही आम्ही त्यांना आदराने पाहतो, असे सांगितल्याचेही समजते.
फडणवीस यांची वाटचाल दिल्लीतील सर्वोच्च पदाकडे…, संजय राऊत यांच्याकडून सूचक विधान
याच काळात उद्धव ठाकरे यांनी केलेले एक विधानही चर्चेत आले आहे. “देवाची इच्छा असेल, तर मुंबईचा महापौर आमचाच होईल,” असे त्यांनी सूचक विधान केल्याचे कळते. सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि संख्याबळाची गणिते लक्षात घेता हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. कारण भाजपाकडे सध्या स्वबळावर महापौर निवडण्यासाठी आवश्यक संख्या नाही.
दरम्यान, “मुंबईचा महापौर आमच्या पक्षाचाच असावा, ही इच्छा कालही होती आणि आजही आहे,” असे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे शिंदे गटातील नगरसेवकांवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याची चर्चा आहे. महापौरपदासाठी अडीच वर्षांची भूमिका कायम ठेवण्यावर एकनाथ शिंदे ठाम असल्याचे सांगितले जात असून, पुढील दोन ते तीन दिवसांत या सत्तासंघर्षाबाबत नेमकी दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
