Shiv Jayanti 2026 : संपूर्ण देशात शिवजयंतीचा उत्साह सुरु असून छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर मध्यरात्री एक मोठी दुर्घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. शिवनेरीवर माध्यरात्री चेंगराचेंगरी झाली असं सांगण्यात येत आहे. चेंगराचेंगरीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे. मात्र शिवनेरीवर खरचं चेंगराचेंगरी झाली का? याबाबत संदीप सिंग गिल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
माध्यमांशी बोलताना संदीप सिंग गिल (Sandeep Singh Gill) म्हणाले की, शिवजयंती निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावर (Shiv Jayanti 2026) दाखल झाले आहेत. पहाटे 3.30 च्या सुमारास मीना दरवाजाजवळ एक ग्रुप वेगाने खाली उतरत होता. तिथे सहा जणांची पोलिसांची टीम होती. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र वरुन कोणीतरी धक्का दिल्याने काही लोक खाली पडले. यात तीन जणांच्या पायांना दुखापत झाली असल्याची माहिती संदीप सिंग गिल यांनी माध्यमांशी बोलताना दिली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन देखील माध्यमांशी बोलताना संदीप सिंग गिल यांनी केला आहे.
तर दुसरीकडे एका वृत्तानुसार, मध्यरात्रीच्या सुमारास अंबरखाना परिसरातील हत्ती दरवाजा आणि गणेश दरवाजा यांच्या दरम्यान असलेल्या एका अरुंद दरवात गर्दी अवाक्याबाहेर झाली होती. जागा अरुंद असल्याने चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती. या दुर्घटनेत काही लोक जखमी झाले असून त्यांच्यावर जुन्नर आणि मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.
