Download App

महाविकास आघाडी तुटली असं मी म्हणालो नव्हतो…स्वतंत्र निवडणुका लढण्यावर राऊत काय म्हणाले?

'उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख आहेत. ते सर्वांशी चर्चा करत असतात. मी फक्त एवढंच म्हटलं होतं की लोकसभेसाठी आम्ही इंडिया आघाडी बनवली.

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut on Elections : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे महाविकास आघाडी तुटली की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. (Sanjay Raut) तसंच, हा निर्णय संजय राऊतांचा आहे, की उद्धव ठाकरेंचा, असा प्रश्नही महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी उपस्थित केला. दरम्यान, आता संजय राऊत यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.

हात जोडतो, पाया पडतो.. उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका; खैरे थेट व्यासपीठावर नतमस्तक

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना त्यांच्या कालच्या विधानाबाबत विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, महाविकास आघाडी तुटली असं मी कधीच म्हणालो नव्हतो. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वबळावर लढाव्यात अशी कार्याकर्त्यांची भावना आहे, ती मी बोलून दाखवली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

नेमंक काय म्हणाले संजय राऊत?

‘उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख आहेत. ते सर्वांशी चर्चा करत असतात. मी फक्त एवढंच म्हटलं होतं की लोकसभेसाठी आम्ही इंडिया आघाडी बनवली. विधानसभेसाठी आम्ही महाविकास आघाडी बनवली. पण स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते, अशावेळी जर आघाडीकरून निवडणूक लढवली, तर कार्यकर्त्यांवर अन्याय होतो, त्यामुळे कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंकडे स्वबळावर लढण्याची भावना व्यक्त केली आहे. याचा अर्थ महाविकास आघाडी तुटली असा होत नाही’, असं संजय राऊत म्हणाले.

‘लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक वेगळी आहे, जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जर स्वबळावर लढवल्या, तर त्याचा पक्ष वाढीस फायदा होईल, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. पक्षाचं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. आम्ही फक्त आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना बोलून दाखवली. आम्ही महाविकास आघा़डी तुटली असं म्हटलेलं नाही. भाजपाबरोबर युतीत असतानाही आम्ही अनेकदा स्वतंत्र निवडणूक लढलो आहे. यात काही नवीन नाही”, असेही संजय राऊत यांनी सांगितलं.

पुढे बोलताना, ”महाविकास आघाडीच्या नेत्यांना बूथ लेव्हलवर काम करण्याची गरज आहे. सर्वांनी पक्ष मजबूत करण्याची गरज आहे. आमच्याकडे आता चार वर्ष आहेत. बूथ मजबूत करण्यासाठी सर्वांना प्रयत्न करावे लागेल’, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात काल आठ जणांवर मकोका लावण्यात आला. यासंदर्भात विचारलं असता, ‘मुख्यमंत्री म्हणतात की कुणालाही सोडणार नाही. पण मुख्य आरोपीला त्यांनी सोडलं आहे. तो सोडून त्यांनी बाकींवर मकोका लावला आहे. ही भाजपाची काम करण्याची पद्धत आहे. बीड आणि परभणीमध्ये जे काही घडलं ते धक्कादायक आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

‘आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होती की ते न्याय करतील. ते म्हणतात की आम्ही गुन्हेगारी खपवून घेणार नाही. मात्र, खपवून घेतलेले लोक त्यांनी पक्षात आणि मंत्रिमंडळात घेतले आहेत. वाल्मिक कराडही त्यांच्याच पक्षात आहे. जे लहान मासे आहेत, ते जाळ्यात अ़डकवले आहेत. मोठ्या माशाला वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याच्यावर खंडणीचा गुन्हा आहे. १५ दिवसात तो परत येईल”, असंही त्यांनी नमूद केलं. शिकागोसारखा कारभार सध्या बीडमध्ये सुरु आहे. भाजपाचेच आमदार या प्रकरणावरून आक्रोश करत आहेत. तरीही मुख्यमंत्री ऐकायला तयार नसतील, तर याचा अर्थ मुख्यमंत्री कारवाई करण्याचं ढोंग करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

follow us