भारत-पाकचं युद्ध ट्रम्प थांबवू शकतात तर मोदी इस्रायल, अमेरिका अन् इराणचं का नाही?, राऊतांचा टोला

भूगोल बदलण्याची शक्यता आहे. याचे भारताला चटके बसतील. तिकडे पर्यटक अडकून पडले आहेत, विमानतळावर हल्ला झाला आहे.

Israil

Israil

इराण आणि इस्त्रायलमध्ये भयंकर युद्ध सुरू झाले असून परिस्थिती (Iran) अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. शनिवारी (28 फेब्रुवारी 2026) इस्त्रायलने अमेरिकेसोबत संयुक्त कारवाई करत इराणवर हल्ला केला. त्यानंतर तेहरानने त्वरित प्रत्युत्तर दिले आणि पश्चिम आशियामधील अमेरिकन एअरबेसवर क्षेपणास्त्र हल्ले केले. तर अमेरिका आणि इस्त्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी ठार झाले आहेत. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय.

संजय राऊत म्हणाले की, अमेरिका, इराण, इस्रायलच्या युद्धात खामोनी आणि त्यांचे कुटुंब ठार झाल्याची बातमी आहे. मोदी दोन दिवसांपूर्वीच इस्रायलहून परतले आणि दुसऱ्याच दिवशी इराण-इस्रायलमध्ये युद्ध पेटले. हा योगायोग असू शकत नाही. मोदींचे ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्याशी जवळचे संबंध आहेत. इराण भारताचा मित्र होता. इस्रायल देखील आहे. काश्मीर प्रश्नावर इराण भारताच्या बाजूने उभा राहिला. अत्यंत स्वस्त दरात इराण तेल देत होता. या युद्धात भारताने एक भूमिका घेणे आवश्यक आहे. मोदी ट्रम्प आणि नेतन्याहू यांचे मित्र आहेत. त्यांनी युद्ध थांबवायला हवं होते, असा हल्लबोल त्यांनी केलाय.

LIVE : अमेरिका इस्त्रायल हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते ठार; नव्या नेत्याची घोषणा, युद्ध पेटलं, पाहा अपडेट

भारत आणि पाकिस्तानचं युद्ध ट्रम्प थांबवू शकतात तर मोदी इस्रायल, इराण, अमेरिका युद्ध का थांबवू शकत नाही? असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले की, हे अत्यंत घातक आहे. आता इराणवर अमेरिका इस्रायल ताबा घेतील आणि हळूहळू पावले भारताकडे वळतील. भारताने केलेल्या ट्रेड डीलमुळे भारत अमेरिकेचा गुलाम झाला आहे. पाकिस्तानला शस्त्र पुरविण्याचे काम राष्ट्राध्यक्ष ट्रम्प करतात. भारताचे परराष्ट्र धोरण काय आहे? की फक्त परदेशात जाऊन मिठ्या मारायच्या आणि भारतात फोटो पाठवायचे. इतके मोठे युद्ध सुरू आहे, त्याचा मोठा परिणाम होईल. हे युद्ध भारताच्या दारापर्यंत आले आहे.

भूगोल बदलण्याची शक्यता आहे. याचे भारताला चटके बसतील. तिकडे पर्यटक अडकून पडले आहेत, विमानतळावर हल्ला झाला आहे. भारतीय परराष्ट्र खातं आता काय करणार? असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. संजय राऊत पुढे म्हणाले की, अमेरिका आणि इस्रायलने ज्या पद्धतीने इराणवर हल्ला केला आहे आणि त्यात खामोनी हे ठार झालेले आहेत, यावर भारताने भूमिका घेणे गरजेचे आहे. हा प्रश्न इराण किंवा इस्रायलचा नाही तर एखादा देश गुंडागर्दी करून एखाद्या देशाचा कशाप्रकारे ताबा घेतो, अशी परिस्थिती जगातल्या कुठल्याही राष्ट्रावर येऊ शकते. अमेरिका इस्रायल एकत्र येऊन कोणालाही मारू शकतात. मोदी हे विश्वगुरू आहेत. त्यामुळे विश्वगुरूंनी या संदर्भात एक भूमिका घेणे गरजेचे आहे, असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

Exit mobile version