मुंबई : भाजपनंतर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठीची (Lok Sabha) पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करुन एकूण १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात विद्यमान पाच खासदारांसह माजी खासदार अनिल देसाई (Anil Desai), भाऊसाहेब वाकचौरे, अनंत गिते, संजय दिना पाटील, चंद्रकांत खैरे यांना मैदानात उतरविण्यात आले आहेत. तर अन्य सात मतदारसंघात नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. (Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) party has announced the first list for the Lok Sabha elections.)
१) बुलढाणा – प्रा. नरेंद्र खेडेकर
२) यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख
३) मावळ – संजय वाघेरे
४) सांगली – चंद्रहार पाटील
५) हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर
६) संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
७) धारशीव – ओमराजे निंबाळकर
८) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे
९) नाशिक – राजाभाऊ वाजे
१०) रायगड – अनंत गीते
११) रत्नागिरी सिंधुदुर्ग – विनायक राऊत
१२) मुंबई – ईशान्य – संजय दिना पाटील
१३) मुंबई दक्षिण – अरविंद सावंत
१४) मुंबई वायव्य – अमोल कीर्तिकर
१५) मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई
१६) परभणी – संजय जाधव
१७) ठाणे – राजन विचारे
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे..
*मुंबई दक्षिण मध्य:श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे.
इतर 16 उमेदवार… pic.twitter.com/nPg2RHimSF— Sanjay Raut (@rautsanjay61) March 27, 2024
संजय राऊत यांनी जाहीर केलेल्या उमेदवार यादीत सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडल्याने सांगली लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा सांगितला होता. मात्र काँग्रेसमध्येही जागा सोडण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये या मतदारसंघावरुन रस्सीखेच सुरु होती. पण ठाकरे यांनी मिरज इथे झालेल्या जाहीर सभेत चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. आता आज जाहीर झालेल्या अंतिम यादीतही पाटील यांचीच उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता काँग्रेस काय करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटासोबत राहिलेल्या विद्यमान पाचही खासदारांना उमेदवारी देण्यात आली आहे. यात धाराशीवमधून ओमराजे निंबाळकर, ठाण्यातून राजन विचारे, परभणीतून संजय जाधव, रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून विनायक राऊत आणि दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवाय छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे, शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे, मुंबई ईशान्यमधून संजय दिना पाटील, मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई आणि रायगडमधून अनंत गिते या माजी खासदारांना उमेदवारी घोषित झाली आहे.