Shocking revelations in the Payal Ranadive case : सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते परिसरात एका 22 वर्षीय विवाहितेच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. पायल रणदिवे असे मृत तरुणीचे नाव असून, तिने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या हातावरच सुसाईड नोट लिहिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह सासू-सासरे आणि दिराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पायल रणदिवे ही माळशिरस तालुक्यातील खुळेवाडी येथे सासरी राहत होती. तिला स्वतःचे ब्युटी पार्लर सुरू करण्याची इच्छा होती आणि त्यासाठी तिने प्रशिक्षण वर्गही सुरू केला होता. मात्र सासरच्या मंडळींनी तिचा क्लास बंद केल्याने ती मानसिक तणावात होती, अशी माहिती समोर येत आहे. शनिवारी सायंकाळी घरात कोणीही नसताना पायलने टोकाचे पाऊल उचलले.
राजधानी दिल्ली हाय अलर्टवर, ISIशी संबंधित मॉड्यूलचा पर्दाफाश, 8 संशयितांना अटक
आत्महत्येपूर्वी तिने आपल्या हातावर सविस्तर मजकूर लिहून सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या छळाचा उल्लेख केला होता. हसू झालंय माझं, माझं पार्लर बंद केले… जीव होता तो माझा… स्वप्न होतं ग… आजपर्यंत शांत बसले पण आता नाही… चांगल्या आई-बापाची लेक आहे म्हणून निघून पण नाही गेले… माझ्यामुळे त्रास झाला त्याच्यासाठी माफी मागते… SORRY, असा मजकूर तिच्या हातावर लिहिलेला आढळून आला.
पायलच्या अंगावर मारहाणीचे व्रण आणि जखमांच्या खुणा दिसून आल्याने तिच्या वडिलांनी पती शशिकांत रणदिवे याच्यासह सासू-सासरे आणि दिराविरोधात शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती आणि सासू-सासऱ्यांना अटक केली असून दिराचा शोध सुरू आहे. दरम्यान, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे नातेपुते परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पुढील तपासात आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
