शिवगंगे टेकडीवर बेपत्ता आयआयटी पदवीधराचा शोध; ड्रोनला दरीत मृतदेहासारखी आकृती दिसली
खोल दरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘शांतला ड्रॉप’च्या पायथ्याशी दाट झाडीत एका मृतदेहासारखी आकृती दिसल्याची माहिती समोर आली आहे.
Search for missing IIT graduate : बंगळुरूमधील 31 वर्षीय सायबर सुरक्षा तज्ज्ञ अद्वैत उपाध्याय यांच्या शोधासाठी सुरू असलेल्या मोहिमेला बुधवारी महत्त्वाचे वळण मिळाले. नेलमंगळा तालुक्यातील शिवगंगे टेकडी परिसरात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), वन विभाग आणि पोलिसांचे सुमारे 100 जवान अद्वैत यांचा शोध घेत आहेत.
ड्रोनद्वारे संशयास्पद मृतदेह आढळल्याची शक्यता
उच्च क्षमतेच्या ड्रोनच्या मदतीने शोधमोहीम राबवित असताना शिवगंगे टेकडीवरील अत्यंत धोकादायक आणि खोल दरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘शांतला ड्रॉप’च्या पायथ्याशी दाट झाडीत एका मृतदेहासारखी आकृती दिसल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर शोधकार्य अधिक वेगाने सुरू करण्यात आले. कठीण आणि घसरड्या भूभागात शोधकार्य सुलभ करण्यासाठी बंगळुरू शहर पोलिस आयुक्तालयाकडून विशेष उपकरणे, ड्रोन आणि तांत्रिक साधनांची मदत घेण्यात येत आहे.
एकट्याने ट्रेकसाठी गेले आणि बेपत्ता झाले
अद्वैत उपाध्याय हे भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे (आयआयटी) पदवीधर असून ते बंगळुरूतील कडुगोडी येथे आपल्या होणाऱ्या पत्नी प्राप्ती चौहान यांच्यासोबत राहत होते. येत्या जानेवारी महिन्यात या दोघांचा विवाह होणार होता. गेल्या शुक्रवारी अद्वैत एकट्याने ट्रेकसाठी शिवगंगे टेकडीकडे रवाना झाले होते. घरातून निघण्यापूर्वी त्यांनी प्राप्ती यांना आपल्या ट्रेकिंगच्या नियोजनाबाबत माहिती दिली होती.
विश्वविद्यालय लिहून दाखवा, मगच पप्पू म्हणणे थांबवेन; राहुल गांधींना ए. के. शर्मांचे आव्हान
पायथ्याशी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये अद्वैत यांनी भाड्याने घेतलेली दुचाकी पार्क करून सकाळी साडेसातच्या सुमारास चढाई सुरू केल्याचे दिसून आले. टेकडीवर पोहोचल्यानंतर त्यांनी प्राप्ती यांना एक सेल्फी पाठवला. मात्र त्यानंतर काही वेळातच त्यांचा मोबाईल फोन बंद झाला. तांत्रिक तपासणीत त्यांच्या मोबाईलचा शेवटचा सिग्नल कुनिगल मार्गावरील कुदूर परिसरात आढळला. हा भाग नियमित ट्रेकिंग मार्गापासून काहीसा दूर असल्याने गूढ अधिकच वाढले आहे.
पोलिसांकडून आत्महत्येच्या शक्यतेचीही चौकशी
अद्वैत यांच्या बेपत्ता होण्याच्या घटनेचा तपास करताना पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन लॅपटॉपची तपासणी केली. त्यामध्ये शिवगंगे टेकडी आणि ‘शांतला ड्रॉप’ दरीची खोली, भौगोलिक रचना यासंबंधी शोध घेतल्याचे आढळून आले. याशिवाय बंगळुरू परिसरातील आत्महत्येसाठी प्रसिद्ध किंवा धोकादायक ठिकाणांबाबतही त्यांनी इंटरनेटवर माहिती शोधल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. तथापि, पोलिसांनी अद्याप कोणताही निष्कर्ष काढलेला नसून आत्महत्येची शक्यता, अपघात, तसेच घातपात किंवा अन्य कोणताही गुन्हेगारी प्रकार अशा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
मुसळधार पावसात सुरू शोधमोहीम
शिवगंगे टेकडी परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे आणि घसरड्या कड्यांमुळे बचाव पथकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरीही विविध यंत्रणांची पथके ड्रोनने दर्शविलेल्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, सुमारे 100 जवान जीव धोक्यात घालून शांतला ड्रॉपच्या पायथ्याशी दिसलेल्या संशयास्पद ठिकाणापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. अद्वैत यांच्या शोधासाठी युद्धपातळीवर मोहीम सुरू असून, त्यांचा ठावठिकाणा लावण्यासाठी सर्व शक्यता तपासल्या जात आहेत.