पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खळबळ; अजित पवारांच्या उमेदवारावर गुन्हा दाखल
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रभाग क्र. 35 मधील उमेदवार फारुख इनामदार यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.
Case registered against Ajit Pawar’s candidate in Pune for abetting suicide : राज्यभरात सध्या चर्चेत असलेल्या महापालिका निवडणुकांदरम्यान अजित पवार(Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे प्रभाग क्र. 35 मधील उमेदवार फारुख इनामदार(Farukh Inamdar) यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभाग क्र. 41 मधील सादिक कपूर यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सादिक कपूर यांनी आत्महत्या करण्याअगोदर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये फारुख इनामदार यांचे नाव लिहिलेले आहे. इतकेच नाही तर त्यांच्या हातावर देखील इनामदार यांचे नाव लिहिलेले आहे. या प्रकरणात मृत सादिक कपूर यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीनुसार पुणे पोलिसांनी फारुख इनामदार यांच्यासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार जागेच्या व्यवहारातून आणि खंडणीच्या दबावामुळे सादिक कपूर यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. फारुख इनामदार यांनी सादिक कपूर यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती. त्याचप्रमाणे त्यांना धमकावण्याचा देखील प्रयत्न केला असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. खानदानी आणि मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप केला आहे.
गेल्या 10 वर्षांमध्ये 21 हजार कोटी खर्च अन् 3 कोटीचा भ्रष्टाचार, साटम यांचा ठाकरेंवर आरोप
या संदर्भात माहिती देताना पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी सांगितले की, “सादिक कपूर यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर त्यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात चार व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये फारुख इनामदार यांचाही समावेश आहे. सुसाईड नोट आणि फिर्यादीतील आरोपांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.”
उपायुक्त शिवणकर यांनी पुढे सांगितले की, सुसाईड नोटमध्ये तब्बल 38 जणांची नावे नमूद करण्यात आली आहेत. “या सर्व व्यक्तींची भूमिका तपासली जाईल. तपासानंतर संबंधितांवर बीएनएस कलम 108 तसेच 3/5 अंतर्गत कारवाई केली जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले. प्राथमिक माहितीनुसार आरोपीकडून 50 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या सर्वांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे.
दरम्यान, मृत सादिक कपूर यांच्याबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सादिक कपूर हे मोक्का अंतर्गत आरोपी असून त्यांच्यावर यापूर्वी दोन गुन्हे दाखल होते. ते फरार होते आणि 18 तारखेला त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे पुणे महापालिका निवडणुकीच्या वातावरणात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
