राजधानी दिल्ली हाय अलर्टवर, ISIशी संबंधित मॉड्यूलचा पर्दाफाश, 8 संशयितांना अटक
दिल्ली पोलीस यांच्या स्पेशल सेलने केलेल्या कारवाईत भीषण हल्ल्याचा कट रचणाऱ्या आठ संशयितांना अटक करण्यात आली आहे.
High alert issued in Delhi in wake of terror attack : देशाची राजधानी दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, एका मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश झाला आहे. दिल्ली पोलीस यांच्या स्पेशल सेलने केलेल्या कारवाईत भीषण हल्ल्याचा कट रचणाऱ्या आठ संशयितांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात हे आरोपी पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI आणि बांगलादेशातील काही दहशतवादी संघटनांच्या सूचनांवर काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.
स्पेशल सेलने राबवलेल्या समन्वित मोहिमेत तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल येथून या आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना पुढील चौकशीसाठी दिल्लीत आणले जात आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये काही बांगलादेशी नागरिकांचाही समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून आठ मोबाईल फोन आणि सोळा सिमकार्ड जप्त केली आहेत. मिजानुर रहमान, मोहम्मद शबत, उमर, मोहम्मद लितान, मोहम्मद शाहिद आणि मोहम्मद उज्जल अशी अटक केलेल्यांची नावे समोर आली आहेत.
तपासात उघड झाले की, आरोपी बनावट आधार कार्डांचा वापर करून विविध ठिकाणी वास्तव्य करत होते. पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एक आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मॉड्यूलने 8 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील विविध भागांमध्ये तसेच मेट्रो स्थानकांवर भडकाऊ पोस्टर्स लावले होते. या पोस्टर्समध्ये काश्मीरसंदर्भातील वादग्रस्त मजकूर आणि ‘फ्री काश्मीर’ सारख्या घोषणा लिहिलेल्या होत्या.
मोठी बातमी; शरद पवारांची 15 दिवसांत दुसऱ्यांदा प्रकृती खालावली; रुबी हॉल क्लिनिकमध्ये केले दाखल
या पोस्टर्सचा तपास सुरू केल्यानंतर संपूर्ण दहशतवादी मॉड्यूल उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी तामिळनाडूमधील तिरुपूर जिल्ह्यातील उथुकुली, पल्लडम आणि तिरुमुरुगनपूंडी परिसरातील गारमेंट युनिट्सवर छापे टाकून संशयितांना अटक केली. दरम्यान, पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा दिल्लीत मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती समोर आली आहे. गर्दीची ठिकाणे आणि धार्मिक स्थळे लक्ष्य करण्याचा त्यांचा डाव असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, मोठ्या शहरांमध्ये आयईडी स्फोट घडवून आणण्याचा कट रचला जात आहे. या पार्श्वभूमीवर जुन्या दिल्लीतील लाल किल्ला आणि चांदनी चौक परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. गर्दीच्या ठिकाणी विशेष निगराणी ठेवली जात असून, स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
