प्रभाग क्र. 12 च्या विकासासाठी शुभ्रा तांबोळींचा ‘प्लॅन 100 डेज’; प्रस्थापितांच्या कारभारावर ओढले ताशेरे

टेक्नॉलॉजी आणि तरुण रक्ताच्या जोरावर प्रभागाचा कायापालट करू, अशा शब्दांत भाजप उमेदवार शुभ्रा पुष्कर तांबोळी यांचं प्रस्थापितांना थेट आव्हान.

Untitled Design (243)

Untitled Design (243)

Shubhra Tamboli’s ‘Plan 100 Days’ :  प्रभाग 12 मध्ये गेल्या 40 वर्षांपासून प्रस्थापित सत्ता असूनही महिलांसाठी साधं शौचालय बांधता आलं नाही, ही शरमेची बाब आहे. अनुभवाचा दावा करणाऱ्यांना वारसा जपता आला नाही, पण आम्ही आता टेक्नॉलॉजी आणि तरुण रक्ताच्या जोरावर या प्रभागाचा कायापालट करू, अशा शब्दांत भाजप उमेदवार शुभ्रा पुष्कर तांबोळी यांनी प्रस्थापितांना थेट आव्हान दिले. ‘आय लव्ह नगर’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी आपले विकासाचे ‘व्हिजन’ आणि विरोधकांच्या अपयशाचा पाढाच वाचला.

महिलांच्या प्रश्नांवर बोलताना शुभ्रा तांबोळी यांनी ‘दुर्गा पथक’ ही संकल्पना मांडली. प्रभागातील महिलांच्या आरोग्याबाबत आणि सुरक्षिततेबाबत मोठी उदासीनता आहे. दुर्गा पथकाच्या माध्यमातून प्रत्येक गल्लीत महिलांचा गट असेल, जो थेट संपर्कात राहील. सरकारी योजनांच्या माध्यमातून महिलांसाठी गृहउद्योग आणि कौशल्य विकास क्लासेस सुरू करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचा माझा मानस आहे, असेही त्यांनी सांगितले.

दिवंगत बार्शीकर यांनी उभारलेल्या ऐतिहासिक वास्तूंच्या दुरावस्थेबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. सौभाग्य सदनची अवस्था दयनीय आहे, बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल बंद पडण्याच्या मार्गावर आहे. प्रस्थापितांनी या ऐतिहासिक ठेव्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. जनतेने संधी दिली तर या वास्तूंचे पुनरुज्जीवन करणे ही माझी प्राथमिकता असेल, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.

मोठी बातमी! अजितदादांच्या नेतृत्वात सर्व प्लॅन तयार; काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

केवळ रस्ते आणि गटारे या पलीकडे जाऊन सुशिक्षित तरुणांच्या रोजगारावर त्यांनी भाष्य केले. आपली एमआयडीसी म्हणावी तशी विकसित नाही. त्यामुळे प्रभागातील तरुणांसाठी ‘कौशल्य विकास केंद्र’ सुरू करून त्यांना थेट जॉब मिळवून देण्याचं प्लॅनिंग मी केलं आहे, असेही तांबोळी यांनी सांगितले.

जनतेने संधी दिली तर कामाचं सोनं करण्यासाठी शुभ्रा तांबोळी यांनी आपला प्रभावी ‘प्लॅन 100 डेज’ (100 दिवसांचा कृती आराखडा) जाहीर केला. या आराखड्यानुसार, पहिल्या शंभर दिवसांत त्या लहान मुलांसाठी बालसंस्कार वर्ग आणि ज्येष्ठांसाठी हक्काची उद्याने विकसित करून एक कौटुंबिक वातावरण निर्माण करणार आहेत. यासोबतच, सरकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष ‘मदत केंद्र’ सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रस्थापितांच्या घराजवळ असलेल्या रस्त्यांवरील दुर्गंधी आणि प्रभागातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था पहिल्या 100 दिवसांत दूर करून स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

विरोधकांवर टीका करताना त्या म्हणाल्या, विरोधकांचा अनुभव नक्कीच मोठा आहे, पण त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात ते अपयशी ठरले आहेत. 40 वर्षे सत्तेत राहूनही जर जनतेला मूलभूत सुविधांसाठी झगडावं लागत असेल, तर तो अनुभव काय कामाचा? भाजपने माझ्यासारख्या महिला उमेदवाराला संधी देऊन पुरुषप्रधान मानसिकतेला छेद दिला आहे.

Exit mobile version