Anjali Damania Criticized Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना दमदाटी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. यानंतर स्वतः अजित पवार यांनी ट्विट करत या प्रकरणी भूमिका मांडली होती. त्यानंतरही विरोधकांनी टीकेची धार कमी केलेली नाही. दुसरीकडे मात्र शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी वेगळाच सूर आळवला. अजित पवार यांच्या हिंदी भाषेतील बोलण्याच्या शैलीमुळे गैरसमज निर्माण झाला, ज्यामुळे वाद वाढला असे रोहित पवार यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जोरदार टीका केली आहे. रोहित पवार यांनी खुशाल अजित पवारांच्या पक्षात जावं असा टोला दमानिया यांनी लगावला आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या, रोहित पवार यांच्या ट्विटवर (Rohit Pawar) मी काय बोलू. ते अजित पवार यांची (Ajit Pawar) सरळसरळ पाठराखण करत आहेत. त्यांना त्यांच्या पक्षात नक्की जावं. कारण आजकाल त्यांचा कल अजित पवार यांच्याकडे जास्त असल्याचं दिसतंय. त्यांची इच्छा असेल तर त्यांनी अजित पवार यांच्या पक्षात जावं. आम्हाला राजकारणात बिलकुल (Anjali Damania) पडायचं नाही. आम्हाला जे योग्य वाटतं त्यावर आम्ही बोलतो. रोहित पवारांना जे काही म्हणायचं आहे ते त्यांना म्हणू द्या. अजित पवारांची पाठराखण करू द्या. आम्हाला जे करायचंय ते आम्ही करणार त्यात आम्हाला कुणाचे सल्ले नको.
आमदार रोहित पवारांनी मंत्री बावनकुळेंची केली कोंडी, ‘ते’ आव्हान स्वीकारत दिलं प्रतिआव्हान
काय म्हणाले होते रोहित पवार
कुर्डुवाडी येथील महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना अजित पवारांनी चांगलंच फटकारलं होतं. या मुद्द्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले होते, की कुर्डुवाडी प्रकरणात महिला अधिकाऱ्याची भूमिका योग्य होती. पण अजितदादांच्या हिंदीमुळे आणि बोलण्याच्या शैलीमुळे गैरसमज निर्माण झाला. आमदार सोबत असूनही सर्वकाही आलबेल असतेच असे नाही असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.
सोलापूर प्रकरणी अजित पवारांचं स्पष्टीकरण
महिला अधिकाऱ्याला दमदाटी केल्याच्या प्रकरणात अजित पवार यांनी ट्विट करून भूमिका मांडली होती. माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा नव्हता. त्या क्षणी परिस्थिती बिघडू नये शांत राहावी याची काळजी घेत होतो. पोलीस दल आणि धैर्याने कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे असे अजित पवार म्हणाले होते.
Amol Mitkari : अजित पवार प्रकरणी मिटकरींचा युटर्न! IPS अधिकाऱ्यावर केलेलं वक्तव्य घेतलं मागे