तुळजापूर : संपूर्ण महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असलेल्या श्री. तुळजाभवानी देवीचे काही दागिने गहाळ झाले असल्याचं समोर येत आहे. यात अगदी शिवकालिन दागिन्यांचा आणि भक्तांनी दान केलेल्या दागिन्यांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी छत्रपती संभाजीराजे यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं आहे. यापुढे सर्व दागिन्यांची मोजणी ऑन कॅमेरा करावी, तसेच याचा संपूर्ण अहवाल सार्वत्रिक करावा, अशी मागणीही संभाजीराजे यांनी केली आहे. (Some ornaments of Tuljabhavani Devi are missing from Tuljabhavani temple, Tuljapur)
छत्रपती घराण्याचे कुलदैवत आणि संपूर्ण महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असलेल्या श्री. तुळजाभवानी देवीच्या दागिन्यांची मोजदाद केली असता, काही ऐतिहासिक महत्व असलेले मौल्यवान दागिने गहाळ झाल्याचे समजत आहे. याची चौकशी व्हावी. तसेच यापुढे सर्व दागिन्यांची मोजणी ॲान कॅमेरा करावी, तसेच याचा संपूर्ण अहवाल सार्वत्रिक करावा. गहाळ दागिन्यांची संपुर्ण चौकशी करण्याची व संबंधित दोषींवर कडक कारवाई करावी अन्यथा स्वराज्याच्या वतीने मोठे आंदोलन उभे करण्याचा इशाराही या पत्राद्वारे देण्यात आला आहे.
संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आणि श्री छत्रपती घराण्याचे कुलदैवत असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या मौल्यवान दागिन्यांचा ताळेबंद करत असता, काही दागिने मिळत नसल्याचे व त्याचा ठावठिकाणा लागत नसल्याचे समजते आहे.
यातील काही दागिने श्री शिवछत्रपती महाराजांनी व पुढे छत्रपती घराण्याने भवानी देवीला अर्पण केल्याच्या नोंद असल्याचे समजत असताना हा निष्काळजीपणा कसा घडला. याला जबाबदार कोण? असा प्रश्न सर्व भक्तांना पडला आहे.
याची सखोल चौकशी लवकरात लवकर करावी व त्याबाबत सविस्तर अहवाल सार्वत्रिक करावा. अन्यथा या गैरप्रकाराबाबत स्वराज्य पक्षाच्या वतीने मोठे जन आंदोलन उभे करण्यात येईल.
* सध्या समितीने दिलेला अहवाल आम्हास तात्काळ मिळावा.
* पुढील काळात दागिन्यांचा ताळेबंद करत असताना व्हिडीओ मेरा समोर करावेत.