न्यायालयाने तब्येतीची काळजी घायला लावलं, उचलून रुग्णालयात टाका म्हटलं नाही : ठाकरे

Uddhav Thackeray धर्मेंद्र प्रधान यांच्यामध्ये असे काय आहे की, अजून किती बळी गेल्यानंतर त्यांचा राजीनामा घेतला जाणार आहे?

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray

उच्च न्यायालयाने सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी घायला लावले होते. त्यांना उचलून रुग्णालयात टाका असे कुठेही म्हटलेलं नाही. असे असेल तर दिल्ली पोलिसांनी आदेश दाखवावा. असेही उद्धव ठाकरे म्हणाले. ते रामरक्षा आंदोलनासाठी उद्धव ठाकरे नागपुरात आले असता ते माध्यमांशी बोलत होते.

लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या आंदोलनावरून शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. सरकारने वांगचूक यांच्याशी तातडीने चर्चा करावी, तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, मी यापूर्वीही सांगितले होते की, भारतीय जनता पक्ष आणि प्रशासन यांचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. ज्या पद्धतीने युवकांच्या भवितव्याशी निर्दयीपणे खेळले जात आहे, ते अत्यंत लज्जास्पद आहे. जर सरकारला सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीची एवढीच काळजी असेल, तर त्यांच्याशी चर्चा करण्याची गरज होती. नीट (NEET) परीक्षेतील गोंधळाचा संदर्भ देत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. “हे सरकार नीटची परीक्षाही व्यवस्थित घेऊ शकत नाही. त्यामुळे प्रशासनावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होते,” असा आरोप त्यांनी केला.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावरही टीका केली. “धर्मेंद्र प्रधान यांच्यामध्ये असे काय आहे की, अजून किती बळी गेल्यानंतर त्यांचा राजीनामा घेतला जाणार आहे? पेपरफुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. आता वांगचूक स्वतःचे प्राण पणाला लावत आहेत. काही विद्यार्थीही उपोषणावर बसल्याचे समजते. युवाशक्ती वाया जात असताना धर्मेंद्र प्रधान यांच्या चुका का झाकल्या जात आहेत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘न्यायालयानेही चिंता व्यक्त केली; सरकारने चर्चेचा मार्ग स्वीकारावा’

सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाबाबत न्यायालयानेही त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. “पोलिसांनी त्यांची भूमिका न्यायालयात मांडावी. मात्र, सरकारकडे अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी वांगचूक यांच्याशी चर्चा करून हे उपोषण सोडवावे,” असे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून उपोषणाच्या आंदोलनांवर चर्चेतून तोडगा काढला जात असल्याचे सांगत, काँग्रेसच्या सरकारच्या काळातही संवादातून उपोषणे मागे घेण्यात आली होती, याची त्यांनी आठवण करून दिली. सरकारने आता संवाद साधून प्रश्न सोडवावा, अन्यथा या आंदोलनाच्या समर्थनार्थ मोर्चा निघायला हवा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.  सरकार चालवणे म्हणजे नेमके काय, हे केंद्राने दाखवून द्यावे. भारतीय जनता पक्ष आणि प्रशासन यांचा दूरदूरपर्यंत संबंध नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

Exit mobile version