माझ्या परवानगीशिवाय औषध देऊ नका; सोनम वांगचुक यांच्या पत्नीची रुग्णालयाला स्पष्ट सूचना
सोनम वांगचुक यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणाऱ्या डॉक्टरांची संमती घेतल्याशिवाय कोणतेही औषध किंवा वैद्यकीय उपचार देऊ नयेत.
Sonam Wangchuk’s wife gives clear instructions to the hospital : नीट परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्या पत्नी गीतांजली जे अंग्मो यांनी महत्त्वाची भूमिका घेत उपचारांबाबत स्पष्ट अट घातली आहे.
गीतांजली जे अंग्मो यांनी आपल्या समाजमाध्यमावरील पोस्टद्वारे रुग्णालय प्रशासनाला आवाहन करत, स्वतःची, कुटुंबीयांची आणि गेल्या 20 दिवसांपासून सोनम वांगचुक यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणाऱ्या डॉक्टरांची संमती घेतल्याशिवाय कोणतेही औषध किंवा वैद्यकीय उपचार देऊ नयेत, असे स्पष्टपणे म्हटले आहे. तोंडावाटे दिली जाणारी औषधे असोत किंवा शिरेद्वारे दिले जाणारे उपचार, कोणतीही वैद्यकीय प्रक्रिया परवानगीशिवाय करू नये, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
I am at Safdarjung hospital in Delhi where @Wangchuk66 has been admitted. Nothing should be administered to him orally or intravenous without take consent from me, his family and his doctors who have been monitoring his health for the past 20 days.
— Gitanjali J Angmo (@GitanjaliAngmo) July 18, 2026
गेल्या 21 दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत उपोषणामुळे सोनम वांगचुक यांची प्रकृती सातत्याने खालावत होती. अखेर शनिवारी त्यांना जंतर-मंतर येथील आंदोलनस्थळावरून हलवून उपचारासाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांच्या शिफारशी आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर हा निर्णय घेण्यात आला.
सोनम वांगचुक हे 28 जूनपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषण करत होते. नीट परीक्षेतील कथित अनियमितता, पेपरफुटीच्या घटना आणि त्यातून विद्यार्थ्यांवर झालेल्या परिणामांच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता. या आंदोलनाद्वारे परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता, जबाबदारी आणि सुधारणा यांची मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, दिल्लीचे उपपोलीस आयुक्त सचिन शर्मा यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करत वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू आहेत. न्यायालयाने यापूर्वीच त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त करत नियमित वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक उपचार सुनिश्चित करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते.
स्कायरूट एरोस्पेसचा मोठा पराक्रम; विक्रम-१च्या यशस्वी प्रक्षेपणाने भारताने रचला नवा विक्रम
रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलग अनेक दिवस अन्नत्याग केल्यामुळे आणि शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्याने सोनम वांगचुक यांना तीव्र अशक्तपणा जाणवत आहे. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे विशेष लक्ष असून पुढील काही दिवस त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.
सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची चिंता वाढत असतानाच त्यांच्या पत्नीने उपचारांबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. आंदोलन, न्यायालयीन निर्देश आणि वैद्यकीय उपचार यांच्यातील घडामोडींवर आता देशभराचे लक्ष लागले आहे.