Sudhir Mungantiwar On TET Paper Leak Case : शिक्षक पात्रता परिक्षा (TET) पेपर फुटीप्रकरणी विरोधकांनी सरकारला घेरले आहे. थेट शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केलीय. दादा भुसे यांनी विधानसभेत निवेदन सादर करत पेपरफुटीप्रकरणातील अटक आरोपी आणि तपासाबाबत माहिती दिली. मात्र सत्ताधारी पक्षाचे सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांचे निवेदनावर समाधान झाले नाही. त्यांना थेट सरकारला काही सवाल करत घेरले आहे.
दादा भुसे यांच्या निवेदनानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहे. ते म्हणाले, पेपर फुटीप्रकरणी मी गृहविभागाचे अभिनंदन करतो, त्यांनी गुन्हा होण्याच्या आधी आरोपींना पकडले आहे. पण एक गोष्ट लक्षात आली आहे. महाराष्ट्र आत्मनिर्भर करण्याचा संकल्प आपला आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे जाण्याचा संकल्प आहे. मग आपण टीईटीच्या प्रश्चपत्रिका आग्रामध्ये का छापतो. अनेक वर्षांपासून प्रश्नपत्रिका आग्रामध्ये छापल्या जात आहे. देशाचा आमच्या राज्यावर विश्वास आहे. नोटा छापण्यासाठी नाशिकची निवड केली जाते. प्रश्नपत्रिका छापण्यासाठी दुसऱ्या राज्यातील आग्राची का निवड करता, असा सवाल सुधीर मुनगंटीवर यांनी विचारला आहे.
गुन्ह्यात पेपर फोडणारे हे दुसऱ्या राज्यातील आहेत. तिजोरीत पैसे ठेवले आणि तिजोरीला टाळेच नाही, असे झाले आहे. पुढच्या अधिवेशनात हा पेपर फुटला, तो पेपर फुटला असे व्हायला नको. पोलिस अधिकारी झोपला असताना तर हे सापडलेच नसते. पेपर झाल्यानंतर हे समोर आले असते, तर वेगळाच गोंधळ उडाला असता, असे मुनगंटीवार म्हणाले.
चार पथके तपासासाठी रवाना-दादा भुसे
याप्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. चार पथकांच्या माध्यमातून चौकशी सुरु आहे. यामध्ये 3 आरोपी अटकेत आहेत. या दाखल गुन्ह्याची व्याप्ती शोधण्यासाठी पोलिस महासंचालकाच्या आदेशानुसार पोलिस सहआयुक्त गुन्हे ठाणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून त्यांच्याकडे गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी बिहारला दोन पथके, हरियाणाला एक पथक आणि दिल्लीला एक पथक रवाना करण्यात आले आहे. तसेच या पेपरफुटीप्रकरणी आवश्यकता पडली तर कायद्यात काही बदल करावे लागतील का, या दृष्टिकोनातून शासनाची तयारी आहे. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये जे कुणी दोषी आढळतील त्यांच्यावर मकोका लावण्यात येईल. तसेच फेरपरीक्षा पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी उमेदवारांकडून कोणतही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच पुढील वर्षीपासून परीक्षा ऑनलाईन होणार असून त्यासाठी समिती नेमण्यात येणार असे निवेदन दादा भुसे यांनी सभागृहात केले आहे.
