Sujay Vikhe : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अहमदनगर शहरात 1 सप्टेंबर रोजी रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ रॅलीचे आयोजन करून सभा घेतली होती. या सभेत बोलताना त्यांनी मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात मुस्लिम समाजाने दिलेल्या निवेदनानंतर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या या प्रकरणावरून शहरातील नाहीतर जिल्ह्याचे राजकारण चांगलंच तापलं आहे. यातच अहमदनगरचे माजी खासदार आणि भाजप नेते सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी संवाद मेळाव्यात बोलताना जर जातीय द्वेष पसरवाल तर गाठ माझ्याशी असं म्हणत नितेश राणे यांना अप्रत्यक्ष टोला लावला आहे.
संवाद मेळाव्यात बोलताना सुजय विखे म्हणाले की, शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या पूर्ण बॉर्डरवर जर कोणी धर्माच्या नावावर किंवा जातीच्या नावावर द्वेष पसरवण्याचा काम केले तर तुमची गाठ माझ्याशी आहे. इथं कोणी असुरक्षित नाही आणि कोणालाही संरक्षणाची गरज नाही. हिंदूंना गरज नाही, मुस्लिमांना गरज नाही. वर्षानुवर्षे सगळे एकत्र राहिले आहे, आज अचानक का संरक्षण पाहिजे? असं या मेळाव्यात बोलताना माजी खासदार सुजय विखे म्हणाले.
पुढे बोलताना सुजय विखे म्हणाले की, आपल्याकडे कोणत्याही व्यक्तीचे काम जात विचारून केलं जात नाही आणि ज्या लोकांना जातीवाद करायचा असेल किंवा धर्मवाद करायचा असेल तर मला सांगा आम्हीपण अर्ज देताना तिथे धर्म लिहा असं सांगू. त्यामुळे जे लोक जातीचा विष पसरवण्याचा काम करत आहे ते अजिबात नको. आपण साईबाबांच्या भूमीवर आहोत, ज्या साईबाबांनी कधीही जातीवाद केला नाही, धर्मावरून भेदभाव केला नाही त्यांचे अनुयायी म्हणून तो संदेश संपूर्ण देशात पोहोचवण्याचा काम शिर्डी विधानसभातून झाला पाहिजे. असं यावेळी सुजय विखे म्हणाले. तसेच जाती धर्माच्या राजकारणामुळे माझ्या सारख्या एक सक्षम आणि चांगला काम करणाऱ्याचा बळी झाला आणि विकास कामे मागे ठेवून माझा पराभव झाला असेही यावेळी माजी खासदार सुजय विखे म्हणाले.
तर दुसरीकडे आज (2 सप्टेंबर) भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात शहरातील मुकुंदनगर परिसरातील महिलांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चाकडून नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. यावेळी महिलांकडून नितेश राणें हाय..हाय.. च्या घोषणा देण्यात आले.
ठाकरेंची लायकी नाही ते भ्रष्ट नेते, नारायण राणेंचा ठाकरेंसह शरद पवारांवर हल्लाबोल
प्रकरण काय
01 सप्टेंबर रोजी रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ हिंदू समाजाच्या वतीने आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली होती. रॅलीनंतर सभेत बोलताना नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे आता मुस्लिम समाजाकडून नितेश राणे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी होत आहे.