थोरातांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी सुजय विखेंनी बाह्या सरसावल्या…
बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil) . हे नगर जिल्ह्यातील तोडीस तोड नेतृत्व. एकत्र असताना किंवा विरोधी पक्षांत असतानाही एकमेकांच्या राजकीय ‘बालेकिल्ल्यां’ना धक्का लागू न देण्याचे तत्त्व दोन्ही नेत्यांनी पाळले. परिणामी आतापर्यंत अहमदनगरचे राजकारण संतुलित होते. पण लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंविरोधात थोरातांनी आपली ताकद लावली. तिथपासून या ‘समझोत्या’ला धक्का बसला तो बसलाच. आता विधानसभा निवडणुकीत विखे थोरात यांच्याविरोधात संगमनेरमध्ये आपली शक्ती लावणार असून लोकसभेचे उट्टे काढण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळेच या मतदारसंघात यंदा चुरस रंगण्याची शक्यता आहे. (Former MP Sujay Vikhe Patil going to contest elections from Sangamner assembly constituency against Congress leader Balasaheb Thorat)
लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या आपल्या स्पेशल सिरीजमध्ये पाहू कशी होईल यंदाची संगमनेरमधील विधानसभेची निवडणूक…
संगमनेर आणि थोरात हे नाते चार दशकांपेक्षाही जुने आहे. माजी आमदार भाऊसाहेब थोरात यांचा राजकीय वारसा घेऊन बाळासाहेब थोरात यांनी राजकारणात एन्ट्री केली. पण 1985 च्या निवडणुकीत काँग्रेसने तिकीट नाकारल्याने त्यांनी अपक्ष उडी घेतली अन् निवडूनही आले. काही काळातच थोरात पुन्हा काँग्रेसच्या मूळ प्रवाहात सामील झाले. त्यानंतरच्या सर्व निवडणुका त्यांनी मोठ्या फरकाने जिंकल्या. सलग आठवेळा संगमनेरमधून निवडून येत थोरात सध्याच्या घडीला राज्यातील ज्येष्ठ आमदार आहेत.
थोरात यांचा जेवढा पगडा विधानसभेवर आहेत, तेवढाच स्थानिक राजकारणावरही आहे. मतदारसंघातील साखर कारखाना, दूध संघ यासह झाडून सगळ्या सहकारी संस्था, नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायती या थोरात यांच्या ताब्यात आहेत. या संस्थांच्या माध्यमातून संगमनेरचे अर्थकारण मजबूत झाले, कार्यकर्त्यांची भक्कम फळी त्यांनी उभी केली. भाजप-शिवसेनेच्या युतीत 1990 सालचा अपवाद वगळता संगमनेर कायमच शिवसेनेकडे राहिला. मात्र सेनेला आजवर एकदाही थोरातांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करता आलेला नाही.
पी.एन. गेले… वारसा राहुल पाटलांकडे : चंद्रदीप नरकेंना ‘करवीर’ अजूनही हाताबाहेर?
2019 च्या निवडणुकीपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी संगमनेर भाजपकडे घेण्यासाठी हालचाली सुरु होत्या. मतदारसंघ आपल्याकडे घेऊन विखे पाटील ज्या उमेदवाराला उभे करतील, त्याच्या मागे पक्षासह विखेंची ताकद उभी करुन थोरातांना शह देण्याची रणनीती आखली होती. मात्र जागा वाटपात मतदारसंघ शिवसेनेकडेच राहिला. त्यावेळी शिवसेनेने उद्याोजक साहेबराव नवले यांना उमेदवारी दिली होती. यात नवले यांना 63 हजार 128 मते मिळाली, तर थोरात 1 लाख 25 हजार 380 मते घेऊन विजयी झाले. आजवरच्या निवडणुकीतील सर्वाधिक 64 टक्के मते थोरात यांना मिळाली होती.
आता यंदाच्या निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील मुलाच्या पराभवाचा बदला घेण्यासाठीची रणनीती आखत आहेत. यात त्यांनी मुलालाच पुढे केले आहे. सुजय विखे पाटील यांनीही या रणनीतीमध्ये साथ देत संगमनेरमधून विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. मला आता वेळ असून शेजारी कुठे संधी मिळाली तर विधानसभा निवडणूक लढवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. ज्या तालुक्यांमध्ये उमेदवाराच्या नावाबाबत समन्वय होणार नसेल आणि तिथे माझ्या नावावर एक मत झाल्यास मी लढवण्यास तयार आहे. यातही श्रीरामपूर राखीव आहे. कोपरगावचे राजकारण क्लिष्ट आहे. त्यामुळे संगमनेर आणि राहुरी हेच दोन पर्याय माझ्यासमोर आहेत, असे ते म्हणाले.
‘पवार इस द पावर, नाद करू नका अन्यथा…’, लंकेंचा थेट राम शिंदेंना इशारा
यातही राहुरीमध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार शिवाजीराव कर्डिले हे भाजपमधून विधानसभेची तयारी करत आहेत. त्यामुळे सुजय विखे पाटील यांच्यासाठी संगमनेर हा मतदारसंघ बाकी राहतो. आजवरच्या निवडणुकीत विखे आणि थोरात यांनी एकमेकांच्या विधानसभा क्षेत्रात थेट लक्ष घातले नव्हते. पण सुजय विखे पाटील यांना भाजपकडून उमेदवारी मिळाल्यास विखे पाटील हे थेट संगमनेरमध्ये येऊनच थोरात यांना आव्हान देऊ शकतात.
संगमनेर शहराला निळवंडे धरणातून केलेली पिण्याच्या पाण्याची थेट पाईप लाईन, शहरातील सर्वच सहकारी संस्थांचा आदर्श आणि स्वच्छ कारभार, कार्यकर्त्यांची मजबूत फळी या बाळासाहेब थोरात यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. अमृतवाहिनी कारखाना आणि शिक्षण समूह हे या मतदारसंघातील बाळासाहेब थोरात याचं एक बलस्थान आहे. अमृतवाहिनी हॉस्पिटल, मेडिकल-फार्मसी कॉलेज, इंजिनीयरिंग कॉलेज असा मोठा लवाजामा आहे. या माध्यमातून त्यांच्या अनेक लोकोपयोगी कार्यक्रम चालवले जातात. मतदारांना बांधून ठेवण्यात अमृतवाहिनी उपक्रमाचा वाटाही मोठा असतो. नुकत्याच पार पडेलल्या लोकसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीच्या भाऊसाहेब वाकचौरे यांना 30 हजारांचे लीड संगमनेरमधून मिळाले होते.
तर गत अडीच वर्षांमध्ये सत्तेच्या माध्यमातून शिर्डी लोकसभा मतदारसंघात आणि संगमनेर तालुक्यात केलेली विकास कामे, निळवंडेंची रखडलेली कामे पूर्ण करणे या विखे यांच्यासाठी जमेची बाजू आहे. तर संगमनेर तालुक्यात भाजपचे कुमकवत संघटन, जिल्ह्यात असलेली कथित नाराजी, लोकसभेला झालेला पराभव, विखे पाटील कुटुंबियांना भाजपच्या जिल्हाध्यक्षांचा असलेला विरोध या सगळ्या विखे पाटील यांच्यासाठी नकारात्मक बाजू आहेत. त्यामुळे सुजय विखे पाटील यांना संगमनेरमधून उमेदवारी मिळाली तर इथे हायव्होल्टेज ड्रामा रंगणार हे नक्की.