दिवसाढवळ्या टाकलेला दरोडा! जबाबदारी लोकप्रतिनिधींची…सिस्पेवरून सुजय विखेंचा खासदार लंकेंवर निशाणा

Sujay Vikhe Criticize Nilesh Lanke : डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) ‘सिस्पे’ प्रकरणाचा उल्लेख करताना म्हटले की, सिस्पे या शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीचे उद्घाटन लोकप्रतिनिधींच्या (Nilesh Lanke) हस्ते संपन्न झाले होते, तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना गाड्यांचे वाटप देखील करण्यात आले होते. परिणामतः, या कंपनीने गोरगरिब शेतकऱ्यांकडून हजारो कोटी रुपये उकळवले आणि (Share Market Fraud) फरार झाली. हा प्रकार म्हणजे दिवसाढवळ्या टाकलेला दरोडाच असून, याची संपूर्ण जबाबदारी उद्घाटन करणाऱ्या लोकप्रतिनिधीने घ्यावी.
लोकप्रतिनिधीची जबाबदारी ठरतेच…
सुजय विखे पुढे म्हणाले, आपला लोकप्रतिनिधी जर अशा फसव्या कंपन्यांचे उद्घाटन करत असेल, तर जनतेला त्यावर विश्वास बसणारच. जनता कर्ज काढून पैसे गुंतवणार, हे अपेक्षितच आहे. त्यामुळे अशा प्रकारात (Ahilyanagar News) उद्घाटन करणाऱ्या त्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी ठरतेच. यासोबतच जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्प आणि विकासकामांचा अभाव या मुद्द्यांवर देखील त्यांनी सवाल उपस्थित केले. मी खासदार असताना वेळेआधी प्रकल्प पूर्ण केले, मात्र गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात एकही महत्त्वाचा केंद्र सरकारचा प्रकल्प आला नाही असे ते म्हणाले.
प्रकरण नेमकं काय?
दरमहा 10 ते 15 टक्के परतावा… गुंतवणूक अल्पावधीत होणार दुप्पट! अशा गोड गोड शब्दांनी समोरच्याचा विश्वास संपादन करायचा मोठ मोठ्या आलिशान हॉटेलमध्ये दिमाखदार सेमिनार घ्यायची. आपल्यावर विश्वास बसेपर्यंत सुरुवातीला काही दिवस परतावा द्यायचा. असं करत करत एके दिवशी थेट गायबच व्हायचं. मात्र, याच विश्वासाला साथ देत शंभर दोनशे नव्हे, तर तब्बल 21 हजार 361 गुंतवणूकदारांना 450 कोटी रुपयांच्या गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगरमध्ये समोर आला आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करून दरमहा 10-15 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत ‘ट्रेडझ ईन्वेस्टमेंट प्रा. लि.’ या कंपनीने तब्बल 450 कोटी रूपयांची फसवणूक केली. या प्रकरणी ‘सिस्पे फिनोवेल्थ इंडिया’ आणि ‘इन्फिनिटी इन्व्हेस्टमेंट’ या कंपन्यांच्या ‘ट्रेडझ इन्व्हेस्टमेंट प्रा. लि.’ या मूळ कंपनीच्या नवनाथ अवताडे याच्यासह आठ जणांविरूध्द सुपा पोलिसांत गुन्हा नोंदवला.
या प्रकरणी विनोद बबन गाडीलकर (वय 44 रा. वाघुंडे, माळवाडी, ता. पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, नवनाथ अवताडे व त्याच्या साथीदारांनी सुरू केलेल्या इन्फिनेट, सिस्पे या कंपन्यातील फसवणूक प्रकरणी श्रीगोंदा व तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आता ‘ट्रेडझ ईन्वेस्टमेंट प्रा. लि.’ या कंपनीत फिर्यादी व इतर 21 हजार 361 गुंतवणूकदारांनी सुमारे 450 कोटी रूपयांची गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे. सीईओ अगस्त मिश्रा, संचालक राहुल काळोखे, गौरव सुखदेवे, प्रसाद कुलकर्णी, सचिन खडतरे, चेतन धर, ययाती मिश्रा व नवनाथ जगन्नाथ अवताडे (सर्व रा. पुणे) यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे.