पशुधन दाखल करुन घेण्यास नकार देणाऱ्या गोशाळा रडारवर; जिल्हाधिकारी पंकज आशिया यांचे कारवाई आदेश

Collector Pankaj Ashiya : प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Collector Pankaj Ashiya) यांनी समितीच्या कार्याचा विस्तृतपणे आढावा घेतला. यावेळी उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, नगरपालिका प्रशासनचे सहायक आयुक्त प्रशांत खांडकेकर, उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. उमेश पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, भटके पशुधन विशेषतः अनाथ गायवर्ग पशुधनास किंवा अवैध वाहतुक वा कत्तलीच्या गुन्हयांमध्ये गृह विभागामार्फत जप्त केलेल्या पशुधनास दाखल करून घेण्यास गोशाळा संचालक वारंवार नकार देत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असून असे प्रकार निदर्शनास आल्यास अशा गोशाळांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी. त्यांना देय असलेले शासकीय अनुदान मिळण्यासाठी शिफारस करण्यात येऊ नये, अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
शहरी व ग्रामीण भागातील पाळीव प्राण्यांसाठी आवश्यक साहित्याची विक्री करणाऱ्या दुकानांची तातडीने नोंदणी करण्यात यावी. नियमबाह्य व विनापरवाना आयोजित होणाऱ्या बैलगाडा/घोडाशर्यतीबाबत कारवाई करण्यात यावी. जिल्ह्यातील शहरी भागामध्ये आढळणाऱ्या भटक्या पशुधनाच्या नियंत्रणाबाबतही आवश्यक ती कार्यवाही करावी. पशुसंवर्धन विभागामार्फत रेबीज प्रतिबंधक लस मात्रा उपलब्ध करून घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील भटक्या पशुधनाचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण करून घेण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
शाहरुख नंतर सलमान खानही क्रिकेटमध्ये; ‘या’ संघाचा बनला मालक
जिल्हयात 52 गोशाळा नोंदणीकृत असून 32 गोशाळांना परिपोषण योजनेअंतर्गत व 19 गोशाळांना मुलभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी शासनाचे आर्थिक सहाय्य प्राप्त झाल्याची माहिती उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. उमेश पाटील यांनी दिली.