Sunil Tatkare’s NCP post under scrutiny after Election Commission complaint : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेत थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती आहे. पक्षाच्या संविधानातील तरतुदी आणि अंतर्गत नियमांचे पालन न करता तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट का घेतली?, काय म्हणाले अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके?
प्रदेशाध्यक्ष निवडताना निर्धारित प्रक्रिया पाळली नाही
मंठा-परतूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरे यांनी ही तक्रार दाखल केल्याचे सांगितले जात आहे. प्रदेशाध्यक्ष निवडताना पक्षाने निर्धारित प्रक्रिया पाळली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे आता तटकरे यांच्या नियुक्तीची वैधता आणि पक्षातील अंतर्गत प्रक्रिया यावरच प्रश्न उपस्थित झाले आहेत.
जालना जिल्ह्यातही नाराजी उफाळली
तटकरे यांच्या कार्यपद्धतीबाबत जालना जिल्ह्यातील काही स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. तटकरे यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी केल्याच्या कारणावरून काही पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आणि पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व यांच्यातील मतभेद आणखी तीव्र झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांविरोधातील तक्रारीमुळे पक्षातील अंतर्गत अस्वस्थता पुन्हा चर्चेत आली आहे.
निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष
सुनील तटकरे यांच्या नियुक्तीविरोधातील तक्रारीवर निवडणूक आयोग काय भूमिका घेतो, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आयोग तक्रारीची चौकशी किंवा दखल घेणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद जाणार ? पार्थ पवार-तटकरे संघर्ष टोकाला !
दरम्यान, या प्रकरणावर सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणती भूमिका मांडली जाते, हेही महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबतचा वाद केवळ पक्षांतर्गत नाराजीपुरता राहतो की त्याला पुढे वेगळे वळण मिळते, हे आगामी घडामोडींवर अवलंबून आहे.
