Vaidyakinhi Toll Plaza : बीड जिल्ह्यातील पाटोदा ते मांजरसुंबा (BEED) मार्गावरील वैद्यकिन्ही टोल नाक्याच्या वसुलीवरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. टोल नाक्यावर काही वाहनांकडून पैसे घेतले जात असताना काही वाहनांना विनाशुल्क सोडण्यात येत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. या प्रकारामुळे टोल वसुलीच्या अधिकृततेबाबत संशय निर्माण झाल्याचं अंधारे यांनी म्हटलं आहे.
सुषमा अंधारे या पाटोदा ते मांजरसुंबा मार्गावरून प्रवास करत असताना वैद्यकिन्ही टोल नाक्यावर थांबल्या. तिथं सुरू असलेला कारभार पाहून त्यांनी कर्मचाऱ्यांकडे टोल वसुलीच्या परवानगीची कागदपत्रं मागितली. मात्र, कर्मचाऱ्यांना अधिकृत परवानगी दर्शवणारी कागदपत्रं सादर करता आली नाहीत, असा आरोप अंधारे यांनी केला. त्यांच्याकडे केवळ टेंडर भरल्याची कागदपत्रं असल्याचंही त्यांनी सांगितलं.
या घटनेबाबत बोलताना अंधारे यांनी टोल नाक्यावरील वसुलीच्या पद्धतीवर संशय व्यक्त केला.
मस्साजोग गावापासून साधारण ४० किलोमीटर अंतरावर पुण्याच्या दिशेनं हा टोल नाका असल्याचं त्यांनी नमूद केलं. टोल वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवश्यक कागदपत्रं दाखवता आली नाहीत, असं सांगत त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या टोल नाक्याच्या वसुलीबाबत प्रशासनाला माहिती नव्हती का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अमोल खुणे यांच्यावर 20 जणांकडून जीवघेणा हल्ला, बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल
टोल नाक्यावरील प्रकाराची माहिती जवळच्या पोलीस ठाण्याला देण्यासाठी हालचाली सुरू केल्यानंतर तिथं उपस्थित असलेला व्यवस्थापक आणि कर्मचारी निघून गेल्याचा दावाही सुषमा अंधारे यांनी केला. वसुलीबाबत विचारणा होताच संबंधित लोक तिथून पसार झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या घडामोडींमुळे टोल नाक्याच्या कारभाराबाबतचा संशय आणखी वाढल्याचं अंधारे यांनी सांगितलं.
अंधारे यांनी या प्रकरणाची माहिती पोलीस अधिकारी आणि तहसीलदारांना दिल्याचं सांगितलं आहे. वैद्यकिन्ही टोल नाका अधिकृत आहे की अनधिकृत, याची प्रशासनानं पडताळणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. टोल वसुलीसाठी आवश्यक परवानग्या आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी त्यांची भूमिका आहे.
दरम्यान, टोल नाका व्यवस्थापनाशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली असता, अधिकृत टेंडर भरूनच टोल नाका चालवला जात असल्याचं सांगण्यात आलं. व्यवस्थापनाकडून यासंदर्भातील अधिकृत पत्रही देण्यात आल्याची माहिती मिळाली. तसेच, देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे काही लेन बंद असून त्या लवकरच सुरू करण्यात येतील, असं व्यवस्थापनानं फोनवरून स्पष्ट केलं. त्यामुळे अंधारे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर प्रशासनाकडून काय पडताळणी केली जाते, याकडे लक्ष लागलं आहे.
