Amol Kolhe Statement on Swarajyarakshak Sambhaji Serial : विकी कौशल अभिनीत छावा हिंदी चित्रपटाला देशभरातून तुफान प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफीसवर चित्रपटाने मोठी कमाई केली आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड गर्दी करत आहेत. छावामुळे ऐतिहासिक चित्रपट आणि मालिकांची नव्याने चर्चा सुरू झाली आहे. अशातच काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेबाबत अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. या मालिकेचा विशिष्ट पद्धतीने शेवटाबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नांची उत्तरे डॉ. कोल्हे यांनी दिली आहेत. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्याचा दबाव माझ्यावर होता असे वक्तव्य डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे.
छावातला ‘तो’ प्रसंग वगळला नाही तर संभाजी ब्रिगेड धडा शिकवेल, दिग्दर्शकाला इशारा
डॉ. कोल्हे यांनी आपल्या यू ट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून याबाबत मोठा खुलासा केला आहे. या मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्याबाबत कुणाचा दबाव होता का? यामध्ये काही राजकीय हेतू होता का? यात शरद पवारांची काही सूचना होती का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अमोल कोल्हे यांनी या व्हिडिओत दिली आहेत.
कोल्हे या व्हिडिओत म्हणतात, स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेला आता पाच वर्षे उलटली आहेत. तरीही ही मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे. मालिकेच्या यशात चाहत्यांचा मोठा वाटा राहिला आहे. सध्या चित्रपटगृहात छावा सिनेमा सुरू आहे. हा सिनेमा पाहण्याचं आवाहन मी आधी केलेलं आहेच. छावा चित्रपट अतिशय उत्तम आहे. यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा अनेक वर्षे लपवून ठेवलेला इतिहास यानिमित्ताने उजळून निघाला आहे.
परंतु, काही अंधभक्तांनी सोशल मीडियावर स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेच्या हेतूबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अशा ट्रोलर्सना मी फारशी किंमत देत नाही. परंतु, त्यांनी मालिकेच्या हेतूविषयी प्रश्न उपस्थित केल्याने उत्तर देणे आवश्यक वाटत आहे.स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखविण्यासाठी कुणाचा दबाव होता का? होय या मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्याचा दबाव माझ्यावर माझ्या टीमवर होता. पण हा दबाव माध्यमांचा होता. दूरचित्रवाणी, ओटीटी आणि सिनेमा ही तिन्ही माध्यमे वेगवेगळी आहेत.
ही मालिका टेलिव्हिजनवर प्रसारीत होत होती. त्यामुळे रेग्युलेटरी बॉडीची काही मार्गदर्शक तत्वे होती. या गाइडलाइन्स नुसारच मालिका दाखवावी लागते. त्यामुळे हिंसाचार किती दाखवावा, रक्त किती दाखवावे याचे काही नियम असतात. या मार्गदर्शक तत्वांना अनुसरुनच मालिकेचा शेवट दाखवण्यात आला असे कोल्हे यांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची काही सूचना होती का याही प्रश्नाचे उत्तर कोल्हे यांनी या व्हिडिओत दिले आहे. कोल्हे म्हणाले, शरद पवार साहेबांनी कधीही अमुक प्रसंग असा दाखवा किंवा तसा दाखवू नका असे कधीच सांगितले नव्हते. किंबहुना शरद पवार यांनी तेव्हा ही मालिका पाहिलेलीच नव्हती. त्यांनी पहिल्यांदा ही मालिका पाहिली ती कोविडच्या काळात ज्यावेळी या मालिकेचं पुन्हा प्रक्षेपण करण्यात आले. त्यामुळे कुणाला तरी खुश करण्यासाठी मालिकेचा शेवट बदलण्यात आला हा धादांत खोटा प्रचार आहे, असे डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.