गृहमंत्र्यांचे कार्यालय सुरक्षित नसेल तर राज्य काय सुरक्षित राहणार? अमोल कोल्हेंचा फडणवीसांवर निशाणा
Amol Kolhe on Devendra Fadnavis : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेच्या फैरी झडत आहेत. आता शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) महायुती सरकार (Mahayuti), भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली. गृहमंत्र्यांचे कार्यालय सुरक्षित नसेल तर त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र कसा सुरक्षित राहील? असा सवाल त्यांनी केला.
अमोल कोल्हे हे आज नगरमध्ये होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात अज्ञात महिलेने धुडगूस घातला, याविषयी विचारलं असता कोल्हे म्हणाले की, गृहमंत्र्यांचे कार्यालय सुरक्षित नसेल तर त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र कसा सुरक्षित राहील? फडणवीस यांच्याच नागपूरमध्ये 240 दिवसांत 213 महिला अत्याचाराच्या घटना घडत असतील, अवैध धंद्यांचे व्हिडिओ प्रसारित होत असतील तर महाराष्ट्र कसा सुरक्षित राहील? असा प्रश्न सध्या निर्माण होतो. अशा शब्दात कोल्हेंनी फडणवीसांवर टीका केली.
लादेन जन्मत: दहशतवादी नव्हता, समाजामुळे बनला; आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाड यांचं विधान
महायुतीने केलेल्या घोषणा कागदावर राहणार…
लाडक्या बहिण योजनेवरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाला असून 40 हजार कोटींची थकबाकी सरकारकडेच आहे. महाराष्ट्रावर आठ लाख कोटींचं कर्ज आहे, असं असतांना महाराष्ट्र सरकार सव्वा लाख कोटींचा कर्ज द्या, अशी मागणी केंद्र सरकारकडे करत आहे. लाडकी बहिण आणि लोकांसाठी कर्ज काढायची वेळ या सरकारवर आली. त्यामुळे महायुती सरकारने केलेल्या घोषणा ह्या कागदावरच राहतील. सरकारकडे या योजना राबवण्यासाठी पैसा शिल्लक नाही, असं कोल्हे म्हणाले.
फडणवीसांनी अजितदादांना साईडलाईन केलं…
महायुतीकडून अजित पवारांना बाजूला सारला जाईल अशा चर्चा आहे. यावर बोलताना खासदार कोल्हे म्हणाले की त्यांना आधीच साईड लाईन केलंलं आहे. भाजपा 160 जागा लढवणार, शिंदे यांच्या पक्षाला 80 जागा तर अजित दादांच्या पक्षाची जेमतेम चाळीस जागांवरच बोळवण केली. त्यामुळं फडणवीसांनी अजितदादांना आधीच साईडलाईन केलं, असं कोल्हे म्हणाले.