TET Paper Leak : पेपर फुटी प्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून देशातील राजकारणात वातावरण तापलं आहे. या प्रकरणावरुन सध्या मोदी सरकारवर चारही बाजूंनी जोरदार टीका होताना दिसत आहे. नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलन सुरु आहे. तर दुसरीकडे आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या बातमीनुसार, महाराष्ट्रातील टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे.
माहितीनुसार, बिजेंद्र कुमार गुप्ता (Bijendra Kumar Gupta) याला बिहारमधून (Bihar) अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी बिजेंद्र याला पुणे विमानतळावर आणले आहे. पुढील तपास आणि कायदेशीर कार्यवाहीसाठी त्याला लवकरच भिवंडीला नेले जाण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे. भिवंडीत आणल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सध्या सखोल तपास सुरु आहे.
राज्यात 28 जून रोजी नियोजित असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर (TET Paper Leak) 27 जून रोजी फुटला होता. या प्रकरणात आता मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ता याला अटक करण्यात आली आहे. बिजेंद्र हा मूळचा बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे.
1.5 कोटी रुपयांना पेपर विकण्याचा कट
तपासादरम्यान, भिवंडी पोलिसांनी प्रश्नपत्रिका 1.5 कोटी रुपयांना विकण्याचा कट उधळून लावला आणि तीन आरोपींना अटक केली. आरोपींकडून प्रश्नपत्रिकेचे चार संच (सेट्स) जप्त करण्यात आले. बिजेंद्र कुमार गुप्ता याची कसून चौकशी केल्यास पेपरफुटीचे जाळे, यात सामील असलेले इतर संशयित, आर्थिक व्यवहार आणि संपूर्ण कटाचा तपशील यांबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर येऊ शकेल.
पंतप्रधान मोदींचा इन्स्टाग्राम विक्रम; 24 तासांत 30 कोटींहून अधिक व्ह्यूज-
अनेक राज्यांत शोधमोहीम
पोलिसांच्या माहितीनुसार, बिजेंद्र कुमार गुप्ता अनेक महिन्यांपासून अटकेपासून वाचत होता. त्याला शोधण्यासाठी बिहारसह विविध राज्यांत सातत्याने शोधमोहीम राबवण्यात आली. अधिकाऱ्यांच्या मते, त्याच्या अटकेमुळे तपासाला नवी दिशा मिळण्याची आणि पेपरफुटी रॅकेटशी संबंधित इतरांना पकडणे सोपे होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात पोलिसांनी बिजेंद्र कुमार गुप्ताच्या पत्नीसह इतर जणांना आधीच अटक केली आहे.
