ठाणे महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना बुधवारी सायंकाळी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी 10 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं. (ACB) विशेष म्हणजे काल बुधवारी ठाणे महापालिकेचा 43वा वर्धापन दिन असतानाच झालेल्या या कारवाईमुळे ठाणे महापालिका वर्तुळात खळबळ माजली आहे.
घंटाळी भागातील अभिराज कन्स्ट्रक्शनच्या एका साईटवरील अतिक्रमण हटवण्यासाठी ही लाच घेतल्याचा पाटोळे यांच्यावर आरोप आहे. पाटोळे यांच्या पालिकेतील कार्यालयातही एसीबीच्या अधिकार्यांनी तपासणी केली असून पाटोळे यांची सध्या चौकशी सुरू असल्याचे समजते. मुलुंड परिसरातील अभिराज कन्स्ट्रक्शन ही कंपनी फ्लाय अॅश ब्रीक्स पुरवण्याचे काम करते. कोपरीतील सॅटीसचे काम या कंपनीला देण्यात आले आहे.
मोठी बातमी! 8 ऑक्टोबरपासून राज्यातून मान्सून निरोप घेणार, काय दिली हवामान खात्याने माहिती?
अभिराज कन्स्ट्रक्शनचे अभिजीत कदम यांच्याकडे एका साईटवरील अतिक्रमण हटवण्यासाठी शंकर पाटोळे यांनी 25 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. यातील 15 लाख रुपये रोख आणि 10 लाख रुपये ओळखीच्या व्यक्तीच्या खात्यातून पाटोळे यांनी घेतल्याचे समजते. मात्र, ही रक्कम घेऊनही पाटोळे यांनी अतिक्रमण हटवले नाही. त्यातूनच अभिजीत कदम यांनी मुंबई एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानंतर एसीबीने ठाणे महापालिका मुख्यालयातील कर विभागाच्या कार्यालयात सापळा रचून अभिजीत कदम यांच्याकडून आणखी १० लाख रुपये घेताना शंकर पाटोळे यांना रंगेहात पकडले, अशी प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका प्रशासनाने 10 ऑक्टोबर 2024 रोजी उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करताना शंकर पाटोळे यांच्याकडे अतिक्रमण आणि निष्कासन उपायुक्तपदाचा कार्यभार दिला होता. अवघ्या वर्षभरातच कारवाईचा सपाटा लावून पाटोळे यांनी राजकीय वाद ओढावून घेतला होता. त्यामुळे 2 दिवसांपूर्वीच ठाणे महापालिका आयुक्तांनी अतिक्रमण विभागाच्या सर्व विभागीय अधिकार्यांची बैठक घेऊन अतिक्रमण हटवण्याच्या कामात कोणतीही हलगर्जी करू नये, अशी तंबी दिली होती.