झारखंडच्या दारू घोटाळ्यात अमित साळुंखे गजाआड, महाराष्ट्रातील रुग्णवाहिका घोटाळ्याशीही संबंध

Amit Prabhakar Salunke Artested : झारखंडमधील दारू घोटाळ्यात सुमित फॅसिलिटीचे संचालक अमित प्रभाकर साळुंखे (Amit Prabhakar Salunke) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रांचीमध्ये अटक केली. बुधवारी एसबीने ही कारवाई केली.
अमित साळुंखे हा छत्तीसगडमधील मद्य व्यावसायिक सिद्धार्थ सिंघानियाचा निकटवर्तीय आहे. सिंघानियाच्या चौकशीदरम्यान आढळलेल्या तथ्यांच्या आधारे अमितला अटक करण्यात आली. दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, साळुंखे हा तोच व्यक्त आहे, ज्यांचे नाव महाराष्ट्रातील संशयास्पद निविदा आणि १०८ रुग्णवाहिका घोटाळ्याशी जोडलेले आहे. महाराष्ट्रात ॲम्ब्युलन्सचे कंत्राट याच साळुंखेला देण्यात आलं होतं. आणखी किती राज्यांना लुटल्यानंतर सरकारला जाग येणार, असा सवाल कुंभार यांनी केला.
Sumit Facility’s Director Amit Prabhakar Salunke arrested by ACB in Ranchi in the massive Jharkhand liquor scam.
This is the same man linked to shady tenders & the 108 Ambulance scam in Maharashtra.
How many states will he loot before governments wake up?#Corruption…
— Vijay Kumbhar (@VijayKumbhar62) July 24, 2025
शिंदेंनी सीएम असताना टेंडर साळुंखेकडे का सोपवले?
तर भैय्या पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, राज्यातील ग्रामीण भागात १०८ नंबरची रुग्णवाहिका चालवण्याचे काम BVG चे हनुमंतराव गायकवाड यांची कंपनी करायची, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी हे काम BVG कडून काढून पात्रता अन् क्षमता नसणाऱ्या सुमित फॅसिलिटी या कंपनीला दिलेले. आज या सुमित फॅसिलिटीच्या मालकाला अमित साळुंखे याला झारखंड ACB ने दारू घोटाळ्यात अटक केली आहे. अशा अपात्र क्षमता नसणाऱ्या लोकांच्या हाती १०-१० हजार कोटींचे टेंडर एकनाथ शिंदे यांनी CM असताना कसे सोपवले याचा प्रश्न पडतो?, असं उद्विग्न सवाल त्यांनी केला.
दरम्यान, या दारू घोटाळ्यात झारखंड एसीबीने आतापर्यंत उत्पादन शुल्क विभागाचे माजी प्रधान सचिव विनय कुमार चौबे, उत्पादन शुल्क सह आयुक्त गजेंद्र सिंह, माजी जीएम वित्त सुधीर कुमार दास आणि सुधीर कुमार, उत्पादन शुल्क माजी आयुक्त अमित प्रकाश यांना अटक केली आहे.
याशिवाय प्लेसमेंट एजन्सी मार्शनचे नीरज कुमार सिंग, छत्तीसगडचे मद्य व्यावसायिक सिद्धार्थ सिंघानिया, प्रिझम होलोग्राफीचे विधू गुप्ता, श्री ओम साई बेव्हरेजेसचे अतुल कुमार सिंग आणि मुकेश मनचंदा यांनाही अटक करण्यात आली आहे.