Maharashtra Weather : महाराष्ट्रात एप्रिल महिन्यातलं उन चांगलच चांगलय. विदर्भ अन् उत्तर महाराष्ट्रात सूर्य आग ओकतोय अशी स्थिती आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील तापमान झपाट्याने वाढलं आहे. (Weather) यामध्ये नागपूर शहर देशातील सर्वात ‘हॉट सिटी’ ठरलं आहे. देशाच्या विविध भागांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. पुढील चार दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. पुढील काही दिवसांत वर्तवला आहे. देशातील सर्वात उष्ण शहर नागपूर ठरले आहे. महाराष्ट्रातील नागपूर शहरात शनिवारी देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. नागपूरचे तापमान ४४.७ अंश सेल्सिअसवर पोहचले. याआधी शुक्रवारीच ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद नागपूरमध्ये झाली होती. परंतु, शनिवारी यंदाच्या हंगामातील सर्वात उष्ण दिवस ठरला आहे.
सावध व्हा! घराबाहेर पडताना विचार करा, या भागांत सूर्य ओकतोय आग; तापमानात वाढ
नागपूर प्रमाणे उत्तर महाराष्ट्रातील भुसावळ शहरात उन्हाचा चटका वाढला आहे. भुसावळचे तापमान पुन्हा ४४.३ अंशावर गेलं आहे. आठ दिवसांनी पुन्हा शहराच्या तापमानाने ४४.३ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. यापूर्वी १० एप्रिल रोजी ४४.४ अंश इतके तापमान नोंदवलं गेलं होतं. त्यानंतर वातावरणात थोडाफार बदल होऊन तापमान ४१.५ आणि ४३ अंशांपर्यंत खाली आलं होतं. मात्र, त्यात पुन्हा वाढ झाली.
राज्यात वाढलेल्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. सकाळी ९ वाजेपासूनच उन्हाच्या झळा जाणवत आहे. उकाड्यामुळे दुपारी वर्दळ कमी झाली आहे. तापमान ४४.३ अंश कमाल तर २८.३ अंश किमान तापमानाची नोंद झाली. आर्द्रता २२ टक्क्यांपर्यंत खाली घसरल्याने हवामान कोरडं आहे. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे.
वाढत्या तापमानाचा परिणाम आता धरणातील जलसाठ्यावर दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणात गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५.२२ टक्के कमी साठा आहे. १७ एप्रिल २०२४ रोजी धरणात ५३.५३ टक्के जिवंत पाणीसाठा होता, तो यंदा ४८.३१ टक्के एवढा आहे. यंदा मार्चपासूनच तापमान चाळिशीच्या पार गेलं. यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढून जलसाठा झपाट्यानं कमी होत आहे.