अन्न आणि औषध प्रशासना विभागाने (Beed) बीड जिल्ह्यात बनावट आणि बेकायदा खाद्यतेल रिपॅकिंग करणाऱ्या माफियांविरोधात एक मोठी कारवाई केली आहे. बीड शहर, माजलगाव आणि वडवणी परिसरातील पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून प्रशासनाने तब्बल 1 कोटी 94 लाख 50 हजार 922 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कारवाईने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईदरम्यान 1 लाख 19 हजार 186 किलो बनावट व बेकायदा साठवणूक केलेले खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे. ‘रिफाइंड’ आणि ‘अल्ट्रा रिफाइंड’ अशी केवळ वरवरची आकर्षक नावे देऊन आणि आकर्षक पॅकिंग बदलून एकाच हलक्या प्रतीचे तेल सर्वसामान्यांच्या माथी मारले जात होते. नागरिकांच्या थेट जिवाशी खेळणारा हा धक्कादायक प्रकार अन्न व औषध प्रशासनाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाने प्रशासनाने बीड शहरातील दोन ऑइल रिपॅकिंग युनिट, वडवणीतील एक आस्थापन आणि माजलगावमधील सुट्टे खाद्यतेल साठवणाऱ्या दोन ठिकाणी ही कारवाई केली. यात खालील पाच आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
1. स्वागत ऑइल इंडस्ट्रीज (बीड)
2. चरखा ऑइल मिल (बीड)
3. जय हनुमान ट्रेडर्स (वडवणी)
4. जानवी कमर्शियल (माजलगाव)
5. विनायक ऑइल मिल (माजलगाव)
सर्वसामान्यांच्या आरोग्याशी गंभीर तडजोड करणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या पाचही आस्थापनांचे परवाने प्रशासनाने तातडीने निलंबित केले असून ती दुकाने व युनिट्स पूर्णपणे सील केली आहेत. भेसळयुक्त आणि बेकायदा खाद्यतेल विक्री करणाऱ्यांविरोधात आगामी काळातही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
