The MP narrowly escaped : सोमवारी पहाटे राजकीय वर्तुळाला हादरवणारी एक गंभीर घटना समोर आली आहे. काँग्रेसचे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रशांत पडोळे यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खासदार प्रशांत पडोळे हे सोमवारी पहाटे आपल्या काही सहकाऱ्यांसह भंडाऱ्यावरून नागपूरकडे निघाले होते. दिल्ली येथे सुरू असलेल्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी ते नागपूर विमानतळावर जात असताना हा अपघात झाला. प्रवासादरम्यान अचानक समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या आलिशान टोयोटा फॉर्च्युनर कारला जोरदार धडक दिली.
या धडकेत गाडीचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला असून अपघाताची तीव्रता मोठी होती. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. खासदार प्रशांत पडोळे यांना किरकोळ दुखापत झाली असून ते सध्या सुरक्षित असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या सोबत असलेले सहकारी देखील सुरक्षित आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तसेच पोलिसांना देखील याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या कडेला हलवण्यात आले.
राजकीय तणावानंतर अखेर कारवाई; सातारा ZP गोंधळप्रकरणी SP तुषार दोषी सक्तीच्या रजेवर
दरम्यान, ज्या ठिकाणी हा अपघात झाला, त्या मार्गावर यापूर्वी देखी अशाच प्रकारचे अपघात घडले असल्याची माहिती समोर येत आहे. हा या मार्गावरील तिसरा मोठा अपघात असल्याने रस्ते सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांकडून या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी केली जात आहे.
या अपघाताची नेमकी कारणे काय होती. ट्रक चालकाची चूक होती का, किंवा रस्त्याच्या परिस्थितीमुळे हा अपघात घडला का, याचा तपस पोलिसांकडून सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज आई प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, या घटनेनंतर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटत असून अनेक नेत्यांनी खासदार प्रशांत पडोळे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळल्याने सर्वांनी दिलासा व्यक्त केला आहे.
