The mystery of the Sagar Moholkar attack has grown : अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली असून कुख्यात गुंड आणि पैलवान अशी दुहेरी ओळख असलेल्या सागर मोहोळकरवर झालेल्या बेछूट गोळीबाराने परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यानंतर या प्रकरणाला नवे आणि गूढ असे वळण मिळाले आहे. हा हल्ला गॅंगवॉरचा परिणाम आहे की, कौटुंबिक वादातून रचलेला कट, याबाबत अनेक तर्क-वितर्क मांडले जात आहेत.
सागर मोहोळकर हे नाव याआधी देखील एका वादग्रस्त घटनेमुळे चर्चेत आले होते. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या कानशिलात लागवल्याची घटना गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडवणारी ठरली होती. 11 एप्रिल 2025 रोजी धाराशिव जिल्ह्यातील आंदरुड येथील यात्रेत भर मैदानात हा प्रकार घडला होता. त्या घटनेनंतर मोहोळकर नाईकांच्या रडारवर असल्याची चर्चा होती. त्यामुळे अलीकडील गोळीबार हा जुन्या वादाचा किंवा गॅंगवॉरचा पुढचा भाग असू शकतो, असा संशय व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यामागे स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांचा किंवा घायवळ गटाचा हात आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. गोळीबाराच्या अवघ्या दोन दिवसांपूर्वीच सागर मोहोळकरच्या वडिलांनी जामखेड पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. तक्रारीत मुलगा मारहाण करतो, असा आरोप करण्यात आला होता. या तक्रारीनंतर केवळ दोन दिवसांतच सागर मोहोळकरवर सात राउंड गोळीबार करण्यात आला. त्यामुळे आता हा हल्ला गँगवॉरमधील बदला आहे की कौटुंबिक वादातून कोणी सूड उगवला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे.
VSR कंपनी मालक व्ही. के सिंगला सीआयडीकडून शाही पाहुणचार? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
सागर मोहोळकर हा केवळ पैलवान म्हणूनच नव्हे तर गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळेही ओळखला जातो. त्याच्यावर हत्येचे दोन गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. याशिवाय तुरुंगात असतानाही एका कैद्याची हत्या केल्याचा आरोपही त्याच्यावर असल्याचे समोर आले आहे. स्थानिक पातळीवरील अनेक वाद, हाणामाऱ्या आणि दहशतीच्या घटनांमुळे त्याची प्रतिमा वादग्रस्त राहिली आहे. त्यामुळे त्याच्यावर झालेला हा हल्ला जुने वैर किंवा गुन्हेगारी संघर्षातूनच झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
या गोळीबाराच्या घटनेनंतर जामखेड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सात राउंड फायर करण्यात आले, त्यापैकी चार गोळ्या अंगात लागूनही सागर मोहोळकर बचावल्याची बाब सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रकरणामागे गुन्हेगारी टोळ्यांमधील संघर्ष आहे का, वैयक्तिक वैर आहे का, की कौटुंबिक वादातून रचलेला कट आहे, याबाबतची स्पष्टता तपासानंतरच येणार आहे.
सध्या पोलीस सर्व शक्य कोनातून तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि संबंधितांच्या गुन्हेगारी रेकॉर्डची छाननी सुरू आहे. सागर मोहोळकरवरील हा हल्ला आता केवळ गोळीबारापुरता मर्यादित न राहता जामखेडच्या गुन्हेगारी विश्वातील सत्तासंघर्षाचे प्रतीक ठरत असल्याची चर्चा परिसरात रंगत आहे.
