Digvijay Singh On CWC : देशाची राजधानी दिल्ली येथे काँग्रेस पक्षाची सीडब्ल्यूसीची बैठक शनिवारी पार पडली आहे. या बैठकीत लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस चेयरपर्सन सोनिया गांधीसह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. या बैठकीत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी काँग्रेसमध्ये अनेक स्लीपर सेल्स असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस हायकमांडकडे केली असल्याची माहिती समोर आली आहे.
आज काँग्रेस (Congress) पक्षात अनेक स्लीपर सेल्स अस्तित्वात आहेत. पक्षाच्या हितासाठी त्यांना ओळखणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. असं या बैठकीत दिग्विजय सिंह (Digvijay Singh) म्हणाले असल्याची माहिती समोर आली आहे. संघटना निर्मिती कार्यक्रमांतर्गत देशभरात जिल्हा पातळीवर संघटना पुन्हा उभारण्याच्या प्रयत्नांदरम्यान, काँग्रेसने मनरेगावर देशव्यापी चळवळ उभारण्यासाठी सीडब्ल्यूसीची (CWC) बैठक बोलावली होती.
सत्तेचे विकेंद्रीकरण आवश्यक
दिग्विजय सिंह यांनी या बैठकीत पक्षातील सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचा मुद्दा उपस्थित केला. संघटनेतील सत्तेचे विकेंद्रीकरण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी संघटनात्मक ताकदीबाबत काँग्रेस नेतृत्वाला दिलेला सल्ला हा तळागाळातील कार्यकर्त्यांच्या कमतरतेवर टीका म्हणून पाहिला जात आहे. काँग्रेस पक्षात समर्पित कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांच्या कमतरतेचा प्रश्न गेल्या काही काळापासून उपस्थित केला जात आहे. पक्षातील एक गट दिग्विजय सिंह यांना मूकपणे पाठिंबा देत आहे. दरम्यान, पक्षातील आणखी एक गटही या विधानाचा संबंध त्यांच्या मुलाच्या आणि त्यांच्या स्वतःच्या भविष्याशी जोडत आहे.
दिग्विजय सिंह यांचे पुत्र जयवर्धन सिंह हे आमदार आणि जिल्हाध्यक्ष आहेत.प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जितू पटवारी आणि विधिमंडळ पक्षाचे नेते उमंग सिगार हे दोघेही दिग्विजय यांचे विरोधक मानले जातात. तर दुसरीकडे दिग्विजय सिंह त्यांचे मत मांडत असताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांना अडवले आणि त्यांचे भाषण पूर्ण करण्यास सांगितले. खर्गे म्हणाले की त्यांना इतर नेत्यांचीही मते ऐकायची आहेत.
एक्स-पोस्टवर अन् अनेक चर्चांना उधाण
काही दिवसांपूर्वी दिग्विजय सिंह यांनी एक्स-पोस्टवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये नरेंद्र मोदी समोर बसलेले आहेत आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी त्यांच्या मागे खुर्चीवर बसलेले आहेत. सिंह यांनी पोस्ट केले आहे की, “मला हा फोटो Quora वर सापडला. हे खूप प्रभावी आहे. एका तळागाळातील RSS स्वयंसेवक आणि जनसंघ भाजप कार्यकर्ता नेत्यांच्या पायाशी जमिनीवर बसून एका राज्याचा मुख्यमंत्री आणि देशाचा पंतप्रधान कसा बनला. ही संघटनेची शक्ती आहे. जय सियाराम.”
