Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्रीच्या पाथरी येथील खंबाट वस्तीत एकाच कुटुंबातील तीन मुलांना लुळेपणा आणि अशक्तपणा आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. (Sambhajinagar) अडीच वर्षांचा एक, नऊ वर्षांचा दुसरा आणि अकरा वर्षांचा तिसरा मुलगा, अशा तिघांना येथील खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.
या घटनेनंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून गावात सर्वेक्षण आणि उपाययोजना सुरू आहेत. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांना घाबरू नये, काळजी घ्यावी असे आवाहन केलं आहे. दरम्यान, खंबाट वस्तीमध्ये तीन मुलांना अचानक लुळेपणा आणि अशक्तपणाची लक्षणे दिसली. याबाबतची माहिती समोर आल्यानंतर आरोग्य विभाग तातडीने कामाला लागला आहे. दोन दिवसांपूर्वी एका मुलालाही लक्षणे जाणवली. त्याला लगेच रुग्णालयात दाखल केलं. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
त्यांना वाल्मीक कराडने अनेक प्रकरणांतून वाचवलं; बीडमधील तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, कुणाचं घेतलं नाव?
डॉक्टरांच्या अंदाजानुसार त्याला जीबीएस (GBS) नसावा. त्यानंतर आणखी दोन मुलांना अशीच लक्षणे दिसली. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती सुधारत आहे. त्यामुळे त्यांनाही जीबीएस नसावा, असा अंदाज आहे. या घटनेनंतर खंबाट वस्तीत सर्वेक्षण सुरू केले आहे. पाण्याचे स्रोत बंद केले आहेत. जवळपासच्या गावांमध्येही सर्वेक्षण सुरू असून लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम सुरू आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी लोकांना घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच, ते म्हणाले, “नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीनही बालकांची प्रकृती सुधारत आहे. पहिल्या मुलामध्ये सुधारणा पाहता त्याला जीबीएस नसावा, असा अंदाज आहे. इतर दोन मुलांमध्येही सुधारणा दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनाही जीबीएस नसेल, असे वाटते. खबरदारी म्हणून आरोग्य विभाग पूर्णपणे लक्ष ठेवून आहे.