आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे, या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्याची शक्यता आहे. (MNS) मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे या पत्रकार परिषदेपूर्वी आज पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाची भेट घेतली आहे.
आज पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळाच्या वतीनं निवडणूक आयोगाची भेट घेण्यात आली आहे. महाविकास आघाडी आणि मनसेच्या वतीनं निवडणूक आयोगाला नऊ मुद्द्यांचं पत्र देखील देण्यात आलं आहे. मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ आहे, जोपर्यंत हा घोळ संपत नाही, तोपर्यंत निवडणूक घेऊ नयेत, अशी भूमिका विरोधकांची आहे, यावेळी मतदार याद्यांमधील घोटाळ्याबाबत जवळपास अर्धातास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
बाळा नांदगावकर काय म्हणाले
मतदार यादीमधील जो घोळ आहे, तो जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत मतदान घेऊ नका अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे. मतदार यादीत सुधारणा करावी, बोगस मतदारांची नावं यादीतून काढावी, अशी आमची मागणी आहे. या संदर्भात शिष्टमंडळाच्या वतीनं निवडणूक आयोगाला 9 मुद्द्यांचं एक पत्र देखील देण्यात आलं आहे. परंतु या भेटीनंतर आमचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला आहे.
एकीकडे आई जेऊ घालेणा अन् बाप भीक मागू देईल अशी परिस्थिती आहे. दबावाखाली काम सुरू आहे, असं आमच्या निदर्शनास आलं आहे, निवडणूक आयोगानं आम्हाला कोणताच सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, असं नांदगावकर यांनी म्हटलं आहे.
