एसटी महामंडळाने काल ऐन दिवाळीच्या तोंडावर 10 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. (ST) त्यानंतर राज्यभरातून अनेक विरोधी प्रतिक्रिया आल्या. दरम्यान, आज हा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय घेतला आहे.
एसटी महामंडळाने दिवाळीच्या तोंडावर, 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या दरम्यान 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्याची घोषणा केली होती. दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रवाशी एसटीचा प्रवास करतात. त्यामुळे या काळात महसूल वाढीसाठी महामंडळाने हा निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयावर सर्व स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. आता ही भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे.
दिवाळी सणाच्या तोंडावरच नागरिकांच्या खिशाला झळ; एसटी महामंडळाकडून भाडेवाढीचा निर्णय
महाराष्ट्रातील सध्याची पूर परिस्थिती लक्षात घेऊन ही भाडेवाढ रद्द करावी असं एकनाथ शिंदे यांनी सुचविलं होतं. त्यावर प्रताप सरनाईक यांनी ही भाडेवाढ रद्द करण्याचे एसटी प्रशासनाला आदेश दिले आहेत. दिवाळी सणासाठी एसटी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. सध्या चारचाकी खासगी वाहने वाढली असली तरीही एसटीने प्रवास करणारेही अनेक प्रवासी आहेत.
या आधी एसटी महामंडळाने 10 टक्के भाडे वाढ प्रस्तावित केली होती. वातानुकूलित शिवनेरी आणि शिवाई बसेस सोडता सर्वच बसेससाठी 10 टक्के दरवाढ लागू करण्यात येणार होती. आधीच राज्यातील बळीराजा अतिवृष्टीने खचून गेलेला असताना, आता दिवाळीपूर्वीच सार्वजनिक वाहतूक प्रवासाच्या भाडेवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसणार होता. मात्र, आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.