दिवाळी सणाच्या तोंडावरच नागरिकांच्या खिशाला झळ; एसटी महामंडळाकडून भाडेवाढीचा निर्णय
मिळालेल्य माहितीनुसार एसटी महामंडळाने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीच्या निमित्ताने 10 टक्के भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.

दिवाळी तोंडावर आलेली असतानाच मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांत नोकरी, कामासाठी आलेले चाकरमानी दिवाळी साजरी करण्यासाठी आपापल्या गावी जातात. दिवाळीच्या काळात (ST) लहान मुलांच्या शाळेलाही सुट्टी असते. त्यामुळे याच काळात काही कुटुंब फिरायला जाण्याचाही प्लॅन करतात. दरम्यान, आता याच सणासुदीच्या काळात एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्य माहितीनुसार एसटी महामंडळाने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीच्या निमित्ताने 10 टक्के भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. ही भाडेवाड येत्या 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या काळासाठी लागू असेल. घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे ही भाडेवाढ महामंडळाच्या सर्वच बसेससाठी लागू होणार नाही. शिवनेरी आणि शिवाई बसेस सोडून इतर बसेससाठी भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता सणासुदीच्या काळात प्रवास करायचा असेल तर प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठंही नाही; नुकसानग्रस्तांच्या मदतीबद्दल मुख्यमंत्र्यांची महत्वाची माहिती
दिवाळीच्या काळात एसटी महामंडळाची मोठी परीक्षा असते. कारण या काळात राज्यभरातील चाकरमानी आपापल्या गावी जातात. सुट्ट्या असल्याने बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते. बसमध्ये बसण्यासाठी लोकांची अक्षरश: झुंबड उडते. या काळात लोकांनी आपापल्या गावी पोहोचावे यासाठी एसटी महामंडळ पूर्ण ताकदीने काम करते. याच काळात एसटी महामंडळाच्या महसुलात मोठी वाढ होते. त्यामुळे प्रवाशांचा वाढणारा ओघ लक्षात घेता एसटी महामंडळाच्या तिजोरीत वाढ व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार हा मुद्दा महामंडळासाठी कायमच मोठी अडचण ठरलेला आहे. एसटी महामंडळाचे कर्मचारी तुटपुंज्या पगारावर काम करतात, असा दावा केला जातो. त्यामुळे अशी भाडेवाढ करून महसूल वाढवण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाचा आहे. या भाडेवाढीमुळे सामान्य प्रवाशांच्या खिशाला मात्र झळ बसणार आहे.