Paresh Rawal Special Tweet For Tukaram Mundhe : आपल्या धडक आणि कडक प्रशासकीय निर्णयांसाठी ओळखले जाणारे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. भेसळखोर, नियम मोडणारे आणि बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या त्यांच्या कारवाईचं सर्व स्तरांतून कौतुक होत असतानाच आता बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनीही त्यांच्या कामाचं समर्थन केलं आहे. विशेष म्हणजे, मुंढे यांची सध्याच्या पदावरून बदली किंवा त्यांना हटवण्यात येऊ नये, अशी थेट मागणी रावल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक्सवरील पोस्टमध्ये केली आहे.
अहिल्यानगरच्या तरुणाचं तुकाराम मुंढे यांना पत्र; मुंढेंकडून थेट ॲक्शन
परेश रावल यांची मुख्यमंत्र्यांना थेट विनंती
परेश रावल यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ पोस्ट केली आहे. नम्रतापूर्वक आणि आदराने हे नमूद करावेसे वाटते की, तुकाराम मुंढे यांची त्यांच्या विभागातून बदली किंवा अन्यत्र रवानगी होऊ नये, हे सुनिश्चित करून त्यांचे संरक्षण करणे हे माननीय मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्राधान्य आणि कर्तव्य (धर्म) असायला हवे अशी विनंती रावल यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केली आहे. रावल यांच्या या पोस्टनंतर तुकाराम मुंढे यांच्या कारवाईची आणि त्यांच्या भविष्यातील नियुक्तीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
To put it with humility and respect that it should the priority and Dharm of Honourable CM @Dev_Fadnavis ji to protect Shri @Tukaram_IndIAS that he should not be xfered or shunted out of his department.
🙏🙏🙏— Paresh Rawal (@SirPareshRawal) August 9, 2026
मुंढेंच्या कारवाईमुळे राज्यभर चर्चा
मे २०२६ मध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात अन्न भेसळ आणि नियमभंगाविरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. अन्नपदार्थांची तपासणी, भेसळयुक्त पदार्थांवर कारवाई, बेकायदेशीर गुटख्याची जप्ती तसेच हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी नियमांची अंमलबजावणी यावर त्यांच्या विभागाने विशेष भर दिला आहे. मुंबईतील काही प्रसिद्ध हॉटेल्सवरही कारवाई करण्यात आली. इतकंच नाही तर उच्च न्यायालयाच्या कँटीनमध्येही स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन आढळल्यानंतर कारवाई करण्यात आली. त्यामुळे मुंढे यांच्या कामाची चर्चा सर्वत्र झाली.
शाळांमधील जंक फूडवरही कठोर भूमिका
तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात शाळांच्या परिसरात विकल्या जाणाऱ्या जंक फूडबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. शाळांच्या ५० मीटर परिसरात हाय-फॅट, हाय-शुगर आणि हाय-सॉल्ट असलेल्या खाद्यपदार्थांच्या विक्री आणि जाहिरातींवर निर्बंध आणण्याच्या निर्णयामुळेही त्यांची चर्चा झाली. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कठोर भूमिका घेणारा अधिकारी म्हणून मुंढे यांच्याकडे पाहिलं जात आहे.
२१ वर्षांच्या कारकिर्दीत अनेकदा बदल्या
तुकाराम मुंढे हे त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत धडक निर्णयांसाठी प्रसिद्ध राहिले आहेत. २१ वर्षांच्या सेवेत त्यांना अनेकदा बदल्यांना सामोरं जावं लागलं आहे. मात्र, प्रत्येक वेळी त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीची आणि कठोर निर्णयांची चर्चा झाली. सध्या अन्न व औषध प्रशासन विभागातील त्यांच्या कारवाईला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. त्यातच आता परेश रावल यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे मुंढे यांना पदावर कायम ठेवण्याची मागणी केल्याने या विषयाला आणखी महत्त्व प्राप्त झालं आहे. परेश रावल यांच्या या पोस्टमुळे तुकाराम मुंढे यांच्या कामगिरीबरोबरच त्यांच्या बदलीचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे. आता सरकार त्यांच्या या धडक कारवाईला पुढे कितपत पाठबळ देतं, याकडे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
