कोणता मुख्यमंत्री जास्त चांगला? प्रश्नावर तुकाराम मुंढेंचे मिश्किल उत्तर; पोस्टिंगबाबतही व्यक्त केली भूमिका

उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात त्यांना दीर्घकाळ कोणतीही महत्त्वाची नियुक्ती मिळाली नव्हती

Untitled Design (6)

Untitled Design (6)

Tukaram Mundhe’s witty reply : अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ, अस्वच्छ हॉटेल्स, बेकायदेशीर खाद्य व्यवसाय आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर सुरू असलेल्या धडक कारवाईमुळे त्यांचे नाव पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. अशातच एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराची सध्या मोठी चर्चा होत आहे.

मुलाखतीदरम्यान तुकाराम मुंढे यांना मागील काही वर्षांतील त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीचा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात त्यांना दीर्घकाळ कोणतीही महत्त्वाची नियुक्ती मिळाली नव्हती, याचा उल्लेख करत या तिघांपैकी कोणता मुख्यमंत्री अधिक चांगला वाटतो, असा थेट प्रश्न त्यांच्यासमोर ठेवण्यात आला.

या प्रश्नावर तुकाराम मुंढे यांनी कोणाचेही नाव न घेता अत्यंत संयत आणि मिश्किल शैलीत उत्तर दिले. मला वाटतं तुमचा रिसर्च जास्त चांगला वाटायला लागलाय, असे म्हणत त्यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला. त्यानंतर त्यांनी सांगितले की, आता हा प्रश्न विचारल्यानंतर मला स्वतःलाच तपासून पाहावे लागेल की खरोखरच एवढा मोठा कालावधी पोस्टिंगशिवाय गेला होता का. कदाचित असेल, मला नेमकी संख्या माहित नाही. मी त्याची कधी मोजदाद केलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण घटनात्मकदृष्ट्या वैध; मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारचा जोरदार युक्तिवाद

यावेळी त्यांनी वेटिंग पिरियड अर्थात नियुक्तीची प्रतीक्षा करण्याच्या काळाबाबतही आपले मत मांडले. आपल्या प्रशासकीय कारकिर्दीच्या सुरुवातीलाच आपण वेटिंगवर होतो, असा खुलासा त्यांनी केला. माझ्या पहिल्याच पोस्टिंगसाठी मला प्रतीक्षा करावी लागली होती. ती परिस्थिती का निर्माण झाली, याची मला माहिती नाही. मात्र कोणत्याही अधिकाऱ्यासाठी दीर्घकाळ वेटिंगवर राहणे चांगले नसते. ते अधिकाऱ्यासाठीही योग्य नाही आणि शासनासाठीही हिताचे नाही, असे मुंढे म्हणाले.

तुकाराम मुंढे हे महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक मानले जातात. विविध ठिकाणी काम करताना त्यांनी नियमांची कठोर अंमलबजावणी, पारदर्शक प्रशासन आणि भ्रष्टाचाराविरोधातील भूमिका यामुळे स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. नागपूर महापालिका, परिवहन विभाग, पुणे महानगरपालिका तसेच इतर महत्त्वाच्या पदांवर काम करताना त्यांच्या निर्णयांमुळे अनेकदा राजकीय वाद निर्माण झाले, तर दुसरीकडे सामान्य नागरिकांकडून त्यांना मोठा पाठिंबा मिळाला.

महागाईचा आणखी एक झटका; 11ऑगस्टपासून दूध दरवाढ, दुग्धजन्य पदार्थही 10 टक्क्यांपर्यंत महागणार

सध्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदावर कार्यरत असताना त्यांनी राज्यभरातील खाद्य व्यवसायांवर धडक तपासणी मोहीम सुरू केली आहे. अस्वच्छता, निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ, बनावट उत्पादने आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधातील कारवाईमुळे विभागाची कार्यपद्धती चर्चेत आली आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा राज्याच्या प्रशासकीय आणि राजकीय चर्चांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांबाबत विचारलेल्या प्रश्नावर कोणत्याही राजकीय वादात न पडता त्यांनी दिलेले संयमी आणि विनोदी उत्तर सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चिले जात आहे.

Exit mobile version