मोठी बातमी! SIR’च्या ड्राफ्ट मतदार यादीत मोठी उलथापालथ; महाराष्ट्रातील तब्बल 2 कोटी 7 लाख मतदारांची नावं गायब

अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला जाहीर होणार असल्याने त्यापूर्वी ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे.

News Photo   2026 08 31T161608.657

SIR च्या ड्राफ्ट मतदार यादीत मोठी उलथापालथ; महाराष्ट्रात 2 कोटी 7 लाख, दिल्लीत 47 लाखांहून अधिक नावं गायब

महाराष्ट्र आणि दिल्लीत स्पेशल इन्टेन्सिव रिव्हिजन अर्थात SIR अंतर्गत प्रारुप मतदार यादी आज 31 ऑगस्ट 2026 रोजी जाहीर करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन करण्यात आलेली पडताळणी, आवश्यक फॉर्म जमा न होणं, डिजिटायजेशनची प्रक्रिया पूर्ण न होणं तसेच इतर तांत्रिक कारणांमुळे मोठ्या संख्येनं मतदारांची नावं ड्राफ्ट रोलमध्ये दिसत नसल्याचं समोर आलं आहे. गैरहजर, स्थलांतरित, मृत, ड्युप्लिकेट आणि विदेशी मतदारांसह इतर श्रेणीतील नागरिकांची नावंही तपासणीनंतर वगळण्यात आली आहेत.

दिल्लीत या प्रक्रियेचा मोठा परिणाम मतदार यादीवर झाल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. राजधानीत एकूण 1 कोटी 45 लाख नोंदणीकृत मतदार आहेत. त्यापैकी तब्बल 47 लाख 56 हजार 722 मतदारांची नावं सध्याच्या ड्राफ्ट मतदार यादीत नाहीत. दुसरीकडे 97 लाख 53 हजार 507 मतदारांचा रेकॉर्ड डिजिटाईज करण्यात आला आहे. त्यामुळे ड्राफ्ट रोलमध्ये नावं नसलेल्या मतदारांनी आपलं नाव पुन्हा तपासणं आणि आवश्यक असल्यास दावा दाखल करणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्रातही ड्राफ्ट मतदार यादीतून मोठ्या प्रमाणावर नावं बाहेर राहिली आहेत. राज्यातील सुमारे 2 कोटी 7 लाख मतदारांची नावं प्रारुप मतदार यादीत समाविष्ट झालेली नाहीत. या मतदारांकडून आवश्यक फॉर्म जमा न झाल्यामुळे त्यांचा रेकॉर्ड डिजिटाईज होऊ शकला नाही. त्यामुळे ड्राफ्ट यादीत नाव नसलं तरी संबंधित व्यक्तीचा मतदानाचा अधिकार कायमस्वरुपी संपला असा त्याचा अर्थ होत नाही.

एसआयआर फॉर्म भरण्याचा आज शेवटचा दिवस; महाराष्ट्रात बंगाल पॅटर्न वापरण्याचा कट रोहित पवारांचा आरोप

ड्राफ्ट रोलमध्ये नाव नसलेल्या मतदारांना आपला दावा किंवा हरकत नोंदवण्यासाठी 31 ऑगस्टपासून 30 सप्टेंबर 2026 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत संबंधित मतदारांनी आपलं नाव तपासून आवश्यक कागदपत्रांसह दावा सादर करायचा आहे. प्राप्त दावे आणि हरकतींची छाननी करून त्यावर 29 ऑक्टोबर 2026 पर्यंत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर 4 नोव्हेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

ड्राफ्ट यादीत नाव गायब असल्यास संबंधित मतदाराने 30 सप्टेंबरपूर्वी Form 6 भरून आवश्यक कागदपत्रांसह नाव समाविष्ट करण्यासाठी दावा दाखल करावा. एखाद्या अपात्र व्यक्तीचं नाव मतदार यादीत समाविष्ट झालं असल्याचं आढळल्यास त्यावर हरकत नोंदवण्यासाठी Form 7 चा वापर करता येईल. तसेच मतदार ओळखपत्र म्हणजेच EPIC मध्ये नावाची स्पेलिंग, पत्ता किंवा इतर तपशीलांमध्ये दुरुस्ती करायची असल्यास Form 8 भरावा लागणार आहे.

त्यामुळे ड्राफ्ट मतदार यादी जाहीर झाल्यानंतर मतदारांसाठी पुढील एक महिना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सर्वप्रथम ड्राफ्ट रोलमध्ये आपलं नाव आहे की नाही, हे तपासणं आवश्यक आहे. नाव गायब असल्यास घाबरून जाण्याचं कारण नसून निर्धारित मुदतीत योग्य फॉर्म आणि कागदपत्रांसह दावा किंवा हरकत दाखल करता येणार आहे. अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला जाहीर होणार असल्याने त्यापूर्वी ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे.

Exit mobile version